अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकला आहे. शिवतीर्थावर चमत्कार घडविण्याचे मनसुबे अखेर धुळीला मिळविण्यात आघाडीला यश आले. अदिती तटकरे यांची अध्यक्षपदी तर, आस्वाद पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष करून शिवतीर्थ दणाणून सोडले.२१ फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली होती. शेकापला सर्वाधिक २३, राष्ट्रवादी काँग्रेसला १२ आणि काँग्रेसच्या तीन जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारत १८ जागा काबीज केल्या आहेत. त्यामुळे आघाडीकडे स्पष्ट बहुमत प्राप्त झाल्याने त्यांचाच आघाडीतील निवडून आलेले सदस्य हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी विराजमान होणार होते; परंतु शिवतीर्थावर चमत्कार घडणार असल्याचे शिवसेनेकेडून वारंवार सांगण्यात येत होते. आघाडीतील नाराज सदस्य पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे मंगळवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.मंगळवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडणुकीच्या कामकाजाला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली. निवडणुकीचे कामकाज हे अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांनी काम पाहिले. आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांनी अध्यक्षपदासाठी, तर शेकापचे आस्वाद पाटील यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या स्वाती नवगणे आणि सुरेंद्र म्हात्रे यांनी अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.निवडणुकीसाठी दुपारी २ वाजता सुरुवात करण्यात आली. चारही अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. कोणीही अर्ज मागे न घेतल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यामध्ये आघाडीच्या बाजूने ३८ तर, शिवसेनेला १८ मते मिळाली. भाजपाचे सदस्य गैरहजर होते. आघाडीला सर्वाधिक मतदान झाल्याने अदिती आणि आस्वाद यांची अध्यक्ष, उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे मलिकनेर यांनी जाहीर केले. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष करून जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्हा परिषदेवर आघाडीचा झेंडा
By admin | Published: March 22, 2017 1:37 AM