वारेतील विकासवाडी शाळेच्या इमारतीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:10 AM2018-08-20T04:10:21+5:302018-08-20T04:10:44+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
- कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे येथील विकासवाडी रायगड जिल्हा परिषद शाळेच्या छताला गेल्या दोन वर्षांपासून गळती लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, इमारतीची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ, तसेच पालकांकडून होत आहे.
वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी रस्त्यावर असलेली विकासवाडी व ओलाचीवाडी या सुमारे ४० घरांची व २२५ लोकवस्ती असलेल्या आदिवासी वाड्या, तेथील मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी शासनाने सात वर्षांपूर्वी सुमारे ८ लाख रु पये खर्चून शाळेची इमारत बांधण्यात आली.
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असलेली ही शाळा २०११ मध्ये सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे. शाळेचे बांधकाम संपूर्ण आरसीसी असून, दोन वर्गखोल्यांची ही इमारत आहे. परंतु दोन वर्षांपासून पावसाळी दिवसात शाळेचे छत पूर्ण गळत असून, वर्गखोल्यात विद्यार्थ्यांना बसण्यास जागा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्याच शाळेतही एका कोपऱ्यात विद्यार्थ्यांना बसून अध्ययन करावे लागत आहे.
इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे पावसाळ्यात छत गळत आहे. त्यामुळे इमारतीच्या भिंतीत पावसाळ्यात सतत पाणी मुरत असल्याने त्या कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तेथील शिक्षकांनी इमारतीच्या छतावर प्लॅस्टिकची ताडपत्री टाकली आहे, परंतु तो उपाय ही कुचकामी ठरत आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यास पर्यायी व्यवस्थाही नसल्याने इमारतीची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आम्ही शाळा दुरु स्तीसाठी ग्रामपंचायतीकडे सतत दोन वर्षे मागणी करत आहोत. शाळेच्या भिंतींना ओल आल्याने त्या कमकुवत झाल्या आहेत. त्या कधीही कोसळण्याच्या स्थितीत असून, मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
- सुकºया मुकणे, ग्रामस्थ विकासवाडी
दोन वर्षांपासून ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे लेखी पत्र देऊन शाळेच्या सद्यस्थितीची माहिती दिली आहे. लवकरच शाळेची डागडुजी करण्यात येईल.
- पल्लवी म्हसे, शिक्षिका,
रा. जि. प. शाळा विकासवाडी