गळके छप्पर, दारूच्या बाटल्या, साचलेला कचरा अन् दुर्गंधी, आरोग्यवर्धिनीची दुरवस्था
By वैभव गायकर | Published: June 14, 2023 10:45 AM2023-06-14T10:45:15+5:302023-06-14T10:45:36+5:30
१६ गावांतील आदिवासींची गैरसोय
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट होऊन आता नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र या नावात रूपांतरित झाल्या आहेत. या केंद्रात उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहेत. परंतु, गळके छप्पर, अडगळीच्या ठिकाणी पडलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच आणि साचलेला कचरा तसेच दुर्गंधी अशी दुरवस्था पनवेलच्या कल्हे आरोग्यवर्धिनी केंद्राची झालेली आहे. या केंद्राला टाळे लागले असून, त्यावर अवलंबून असलेल्या १६ गावांतील आदिवासींची आरोग्य सुविधांअभावी परवड होत आहे. त्यांना खासगी रुग्णालयात जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.
कल्हे आरोग्यवर्धिनी केंद्रावर डोलघर, तारा, बांधणवाडी, बारापाडा या गावांसह रानसईमधील पाच ते सहा आदिवासी वाड्या, कल्हे गावासह आखाडवाडी, बामनडोंगरी, लहूंची वाडी, विठ्ठलवाडी आदी जवळपास १० ते १६ गावे व आदिवासी वाड्या अवलंबून आहेत.
१३ आरोग्य सुविधा
या केंद्रांतर्गत १३ प्रकारच्या आरोग्य सुविधा दिल्या जातील. त्यात प्रामुख्याने प्रसूतिपूर्व व प्रसूती सेवा, नवजात अर्भक व नवजात शिशूंना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवा, बाल्यावस्था व किशोरवयीन आरोग्यसेवा तसेच लसीकरणासह विविध सुविधांचा समावेश असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कल्हे आरोग्यवर्धिनी केंद्रात एएमएम नर्स पद रिक्त आहे. या पदावरील एएनएम निवृत्त झाल्याने केंद्रात सध्या कोणीच नाही. त्या ठिकाणच्या आरोग्यसेवक पुरुषांना तत्काळ याबाबत सूचना देण्यात येतील. दुरवस्था दूर करण्यात येईल.
- डॉ. सुनील नखाते, आरोग्य अधिकारी, पनवेल