पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाला गळती; तिवरे दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 04:28 AM2019-07-04T04:28:42+5:302019-07-04T04:28:55+5:30

पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाच्या भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे त्यातून दररोज हजारो लीटर पाणी वाहून जात आहे.

 Leaves of Morbe dam in Panvel taluka; Fear of repeat accident | पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाला गळती; तिवरे दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती

पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाला गळती; तिवरे दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती

googlenewsNext

नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील मोर्बे धरणाच्या भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे त्यातून दररोज हजारो लीटर पाणी वाहून जात आहे. सलग पाच दिवस धो-धो कोसळलेल्या पावसामुळे सध्या हे धरण भरून वाहू लागले आहे. त्याचबरोबर धरणाच्या जीर्ण झालेल्या भिंतीतून सुद्धा पाण्याच्या धारा लागल्या आहेत. धरणाच्या आतील भागातून पाण्याचा दाब वाढल्यास अगोदरच जीर्ण झालेल्या धरणाच्या भिंती फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून ही परिस्थिती असताना सुद्धा त्याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३ ग्रामस्थ अद्याप बेपत्ता आहेत. तिवरे धरण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्बे धरणाला लागलेल्या गळतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पनवेल तालुक्यातील खैरवाडी- गारमाळ परिसरात ५0 एकर जागेवर मोर्बे धरण वसलेले आहे. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ या धरणाचे पाणी शेतीसाठी वापरतात. तर मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांतील ग्रामस्थ या धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. ३.२२ दशलक्ष घनमीटर इतकी या धरणाची पाणी साठवण क्षमता आहे. नियोजन केल्यास परिसरातील गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. परिसरातील आदिवासी पाड्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या नकारात्मक धोरणामुळे हे धरण दुर्लक्षित राहिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पनवेल तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पनवेल शहरात तर दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. काही वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शहरी भागात जेमतेम पाणीपुरवठा होत असला तरी तालुक्यातील ३६ गावे आणि वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाच दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मोर्बे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मागील पाच दिवसांपासून त्यातून शेकडो लीटर पाणी वाहून जात आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्याने धरणाच्या भिंतीला तडे गेले आहेत. भिंतीला पाझर फुटल्याने ठिकठिकाणावरून गळती लागली आहे. त्यामुळे भिंती आणखी कमकुवत झाल्या आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास तिवरे धरणासारखी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक रहिवाशांना भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करून धरणाची डागडुजी करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

- पन्नास एकर क्षेत्रावर वसलेल्या मोर्बे धरणाची पाणी साठवण क्षमता ३.२२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. योग्य नियोजन केल्यास परिसरातील गावांसाठी या पाण्याचा वापर होवू शकतो. परंतु पाटबंधारे विभागाने त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्याऐवजी धरणात मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी पिंजरा पालन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यातून पाटबंधारे विभागाला उत्पन्न मिळत आहे. मत्स्यपालन व्यवसायातून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणाऱ्या पाटबंधारे विभागाला धरणाच्या सुरक्षेचा मात्र सोयीस्कररीत्या विसर पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथे तिवरे धरणासारखी दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग असेल, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.

Web Title:  Leaves of Morbe dam in Panvel taluka; Fear of repeat accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल