म्हसळा नगरपंचायतीची आरक्षण सोडत; १७ जागांसाठी नऊ प्रभाग महिलांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 01:01 AM2020-11-29T01:01:17+5:302020-11-29T01:02:01+5:30
आठ जागांवर पुरुष रिंगणात, खुल्या प्रवर्गासाठी आठ प्रभाग राहणार असून यातील प्रभाग क्रमांक ८, ११, १५ आणि १७ हे प्रभाग महिलांकरिता आरक्षित ठेवले आहेत.
म्हसळा : म्हसळा नगरपंचायत निवडणुकीची आरक्षण सोडत शनिवारी कन्याशाळेच्या हॉलमध्ये जाहीर करण्यात आली. १७ जागांसाठी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत नऊ प्रभाग महिलांसाठी आरक्षित असून, आठ जागांवर पुरुष अथवा स्त्री उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. ही बैठक प्रारूप प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीविषयी घेण्यात आली. प्रभाग रचनेत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. मात्र सगळ्या वॉर्डचे भौगोलिक रचनेनुसार नंबर बदलले
आरक्षण सोडत काढण्यासाठी श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनी कामकाज पाहिले. नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित तर प्रभाग क्र. ४ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे. यातही हे दोन्ही प्रभाग महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग याकरिता प्रभाग क्रमांक २, ३, ६, ७ आणि १३ हे प्रभाग राखीव करण्यात आले असून यात प्रभाग क्रमांक २, ३, १३ हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव ठेवले आहेत.
खुल्या प्रवर्गासाठी आठ प्रभाग राहणार असून यातील प्रभाग क्रमांक ८, ११, १५ आणि १७ हे प्रभाग महिलांकरिता आरक्षित ठेवले आहेत. तर उर्वरित ५, ९, १० आणि १४ हे प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले ठेवले. या वेळी नगराध्यक्ष जयश्री कापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर बनकर, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, काँग्रेसचे मोईज शेख, रफिक घरटकर, शिवसेना शहर प्रमुख अनिकेत पानसरे, भाजप शहर अध्यक्ष संतोष पानसरे आदी उपस्थित होते.
मोजक्याच महिलांची उपस्थिती
आरक्षण सोडतीवेळी शहरातील एकूण नऊ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित होत असताना मोजक्याच महिला प्रतिनिधींची उपस्थिती होती. आरक्षण सोडतीवेळी निवडणुकीविषयी महिलांमध्ये असलेली उदासीनता प्रकर्षाने जाणवली.
गणिते जुळवायला सुरूवात
आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेकांना खुशी झाली तर काही आपल्याला सोयीनुसार प्रभागात आरक्षण न पडल्यामुळे नाराज झाल्याचे चित्र होते. काहींनी मात्र लगेच गणिते जुळवायला सुरुवात केल्याचे चित्रसुद्धा दिसत होते.