महाड : एनआरसी कायदा हा मुस्लिमांना त्रासदायक नसून, तो आपल्या सर्वांनाच त्रासदायक आहे, या देशात असे कायदे करून जर्मनीसारखी हिटलरशाही आणण्याचा डाव या सरकारचा असल्याचा आरोप बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी महाडमध्ये केला. महाडमध्ये मनुस्मृती दहन वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते, त्याच ऐतिहासिक क्रांतीस्तंभ येथे एनआरसी कायद्याचे प्रतिकात्मक दहन आनंदराज आंबेडकर यांनी करून मोदी सरकारचा निषेध केला.
आंबेडकर पुढे म्हणाले, मनुस्मृती दहन करून बाबासाहेबांनी आपल्याला या कर्मठ अंध रूढींपासून मुक्त केले. महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. बाबासाहेबांनी हे ऐतिहासिक कार्य केले नसते, तर आजही आपण या कर्मठ अंध रूढींच्या जोखडात अडकून पडलो असतो. त्यामुळे आता आपण विज्ञानाच्या मार्गाने चला, असा सल्लाही आनंदराज आंबेडकर यांनी दिला. या वेळी अनेक नेत्यांची भाषणे झाली. या सर्वांनी एनआरसी कायद्यावर बोट ठेवत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. सभेचे प्रस्ताविक अशोक जाधव तर सूत्रसंचालन लक्ष्मण भगत यांनी केले. या वेळी ज्येष्ठ समाजसेविका डॉ. प्रमिला संपत, रमा वानखेडे, संघमित्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास वंचित राष्ट्रीय महिला मंडळ आयोजित भारतीय महिलादिन परिषद घेण्यात आली.