मधुकर ठाकूर, उरण: महिला कुस्तीगीरावरील लैंगिक शोषणातील आरोपीला त्वरित अटक करा या मागणीसाठी गुरुवारी (१८) उरणच्या गांधी चौकात डाव्या संघटनाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष खासदार ब्रिज भूषण सिह याला अटक करा या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली. १८ मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील देशभरात "चला अत्याचार विरोधात रस्त्यावर उतरू या" ही मोहीम राबविण्यात आली.
यावेळी किसान सभेचे रायगड जिल्हा सचिव संजय ठाकूर,जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील, जनवादीच्या रायगड जिल्हा अध्यक्ष अमिता ठाकूर,कामगार नेते भूषण पाटील, सिटु चे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुसूदन म्हात्रे, डीवायएफआय युवक संघटनेचे रायगड सेक्रेटरी राकेश म्हात्रे यांनी आपली मतं मांडली. यावेळी केंद्र सरकारचा धिक्कार करून ब्रिजभूषण सिंह यांना अटक करा आदी घोषणा देण्यात आल्या. दिल्लीच्या जंतरमंतर येथे मागील २६ दिवसापासून कुस्तीगीर महिलांनी त्यांच्यावरील लैंगिक शोषणा विरोधात गुन्हा दाखल होऊन ही अटक का केली जात नाही. याचा जाब विचारण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात जनवादी महिला संघटना,सीआयटीयु, अखिल भारतीय किसान सभा व डीवायएफआय या संघटना यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी जनवादी महिला संघटनेच्या वतीने उरण तालुका आणि शहरात सह्याची मोहिमही राबविण्यात आली.