म्हसळ्यात बिबट्याचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:39 PM2019-01-31T23:39:40+5:302019-01-31T23:40:49+5:30
नेवरुळ गावात बैलाला केले ठार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
म्हसळा : तालुक्यातील जंगल भागात बिबट्यांंचा संचार आहे. हे बिबटे गाव परिसरात चारा खाण्यासाठी गेलेल्या पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार मारण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बुधवार, ३० जानेवारी रोजी नेवरुळ येथील महिला शेतकरी लीला हरी पगार यांच्या मालकीचा बैल गावालगतच जंगल भागात चरण्यासाठी गेला असता त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. यामुळे नेवरुळ गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यापासून ३0 किलोमीटर अंतरावर जंगल आहे. त्यामुळे अनेक वेळा जंगली प्राणी लोकवस्तीत येतात. यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी होण्याचे आणि गोधनाचे नुकसान झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. त्यामुळे सातत्याने घडणाऱ्या या घटनांकडे वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तर ३० जानेवारीला बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याने लीला पगार यांनी म्हसळा वनविभागाकडे लेखी तक्रार करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी वनक्षेत्रपाल एन.डी.पाटील यांच्याकडे लेखी अर्ज केला आहे. घटनास्थळी जाऊन म्हसळा येथील वनपाल सुधाकर थळे आणि वनरक्षक बनसोडे यांनी पंचनामा के ला आहे.
पशुधनाचे नुकसान
दरवर्षी म्हसळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार ते पाच पशुधनाचे नुकसान होत असल्याची नोंद म्हसळा वनविभाग कार्यालयात होते. १ एप्रिल २०१४ ते ४ डिसेंबर २०१८ पर्यंत वनविभाग म्हसळा हद्दीत पशुधनाच्या आॅनलाइन नुकसानीच्या १४ घटना घडल्या आहेत तर आॅफलाइनच्या १५ पैकी १४ गोधनाचे नुकसानीचे म्हसळा वनविभागाचे माध्यमातून योग्य तो वैद्यकीय पंचनामा व तपासणी करण्यात आली आहे. संबंधित शेतकºयांना त्यांच्या पशुधनाची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. बिबट्याच्या हल्लात गंभीर जखमी केलेल्या शेतकºयाला म्हसळा वनविभागाच्या माध्यमातून एक लाख रु पयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.