नागाव परिसरात बिबट्याची दहशत कायम
By निखिल म्हात्रे | Published: November 2, 2023 04:48 PM2023-11-02T16:48:50+5:302023-11-02T16:49:21+5:30
आक्षीबरोबरच थेरोंड्यामध्येही बिबट्या फिरत असून त्याने एका घोड्याला जखमी केल्याची चर्चा होती.
अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून नागाव, आक्षी, रेवदंडा परिसरात बिबट्या असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. सर्वप्रथम नागाव येथील समिरा परिसरात रात्री १ ते २ च्या सुमारास बिबट्या असल्याचे रात्रीपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री (दि. २७) रायवाडी समुद्रकिनारी बिबट्या असल्याची चर्चा सुरू होती. तेथील स्थानिकांनी रात्रीच्या सुमारास बिबट्या बघितल्याचे खात्रीशीर सांगितले होते. ग्रामस्थांसह वन अधिकाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या असण्याचे काही पुरावे मिळाले नाहीत. त्यानंतर रविवारी सकाळी वन विभागाने आक्षी समुद्रकिनारी पाहणी केली. या वेळी त्यांना ठसे आढळले असून, ते ठसे बिबट्याचे असण्याची शक्यता असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. आक्षीबरोबरच थेरोंड्यामध्येही बिबट्या फिरत असून त्याने एका घोड्याला जखमी केल्याची चर्चा होती.
यातच आता नागाव परिसरातील खारगल्ली येथील डोंगराळ भागात बिबट्याचा वावर असल्याची बातमी जोर धरू लागली आहे. सोमवारी (दि. ३०) खारगल्ली येथील एका ग्रामस्थाच्या बोकडाची बिबट्याने शिकार करून नेले असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच रात्रीच्या वेळेस ग्रामस्थ व वन कर्मचारी यांनी बिबट्या बघिल्याचे खात्रीशीर सांगितले. त्यावेळी अंधार असल्यामुळे बिबट्याला नीटसे पाहू शकले नाहीत व त्याचे छायाचित्रही काढता आलेले नाही. यानंतर वनाधिकाऱ्यांकडून कोणतीही शोधमोहीम करण्यात आलेली नाही.