पेण : कुष्ठरोग निर्मूलनासाठी शालेय स्तरावर या रोगाबाबत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमार्फत शाळेच्या नोटीस बोर्डच्या दर्शनी भागात लोकशिक्षणातून कुष्ठरोग नियंत्रण प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी जनजागृती म्हणून भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून कुष्ठरोगाबाबतची इत्थंभूत माहितीची कात्रणे केलेल्या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर व पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मंगेश नेने यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी उपाध्यक्ष संजय कडू, ‘लोकमत’चे जाहिरात विभागाचे विनोद भांडारकर, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य कुलकर्णी व प्रशालेचा शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
या भित्तीपत्रिकेवर कुष्ठरोगाची लक्षणे, कुष्ठरोग अनुवांशिक नाही. यावर उपचार करणाऱ्या औषधांच्या मात्रेने रोग पूर्णत: बरा होतो. चट्टा आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखविणे. कुष्ठरोगांच्या पेशंटला दूर लोटू नका. कुष्ठरोग दोन प्रकारचा असतो. पी. बी. रुग्णांसाठी सहा महिने व एम. बी. रुग्णांसाठी १२ महिने औषधोपचाराने कुष्ठरोग पूर्णत: बरा होतो. या सर्व इत्थंभूत माहितीचे संकलन या भित्तीपत्रिकेमध्ये करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.