कर्जत : आजच्या काळात घरोघरी गॅस सिलिंडर आहे. एवढेच काय तर केंद्र सरकारच्या उज्वला योजनेमुळे दुर्गम भागातही गॅस सिलिंडरचा वापर आहे. मात्र या सिलिंडरमधून गॅसची गळती किंवा त्यातून गॅसची चोरी तर केली जात नाही ना, कारण प्रत्यक्षात वजनापेक्षा सिलिंडरमध्ये कमी गॅस असल्याचा संशय व्यक्त केला गेला. यामुळे गॅस सिलिंडर धारकांच्या वतीने कर्तव्य आणि उपभोक्ता ग्राहक या सामाजिक संस्थेने कर्जत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी संजय तंवर यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित सर्व गॅस एजन्सी धारकांनी यापुढे गॅस सिलिंडरचे वजन करूनच ग्राहकांना द्यावे अशी मागणी केली आहे .
सद्य स्थितीत कर्जत तालुक्यातील कोणत्याही घरघुती गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीकडे कोणत्याही प्रकारचे गॅस मोजणी यंत्र (वजन काटा )नाही. ग्राहकांनी सिलिंडरची नोंद केली की त्या एजन्सीचा कर्मचारी सिलिंडर घरोघरी पोच करतो. ग्राहकही याबाबत कुठलीही शंका कुशंका व्यक्त न करता सिलिंडर जोडून घेतात. मात्र ग्रामीण भागातील ग्राहक शक्यतो सिलिंडर लगेच मिळावा या करिता स्वत: एजन्सीत जाऊन घेतात.
यापैकीच काही ग्राहकांना सिलिंडरमध्ये वजनापेक्षा कमी गॅस असल्याची शंका आल्याने त्यांनी याबाबत कर्तव्य या सामाजिक संस्थेचे विशाल माळी तसेच उपभोक्ता ग्राहक संस्थेच्या ही बाब निदर्शनास आणून दिली असता या संस्थांनी याची दखल घेत कर्जत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे निवेदन सादर करत गॅस एजन्सीने यापुढे सिलेंडरचे वजन करून द्यावे जेणे करून जेवढ्या किलोची टाकी आहे तेवढा गॅस आहे का? हे ग्राहकाला समजेल व त्याची फसवणूक तथा आर्थिक नुकसान होणार नाही अशी मागणी केली आहे .
घरगुती गॅस सिलिंडरचे वजन १४.२ किलो असते तर हॉटेलसाठी येण्याºया टाकीत १९ किलो गॅस असतो. कर्जत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी संजय तंवर यांनी याबाबत सद्यस्थितीत तशी सोय नाही. मात्र यावर काही उपायोजना करता येईल का ते पाहू असे आश्वासन तक्रारदारांना दिले .