समाजमंदिरात विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे, आतोणेतील शाळेची दुरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 02:31 AM2020-01-19T02:31:21+5:302020-01-19T02:31:46+5:30

गेल्या तीन वर्षांपासून ही शाळा एका समाजमंदिरात भरते आहे. पाऊस आला की फरशी ओली होते. वारा सुटला की वह्या, पुस्तके फाटतात.

Lessons of falling education in the Samaj Mandir, school situation in Atone | समाजमंदिरात विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे, आतोणेतील शाळेची दुरवस्था

समाजमंदिरात विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे, आतोणेतील शाळेची दुरवस्था

googlenewsNext

- मिलिंद अष्टिवकर
रोहा : शाळा निटनेटकी असली, भौतिक सुविधा असल्या आणि हसत-खेळत शिक्षण मिळाले की, विद्यार्थ्यांचे मन रमते आणि ज्ञानदान प्रभावी ठरते. मात्र, यापैकी एकही घटक नसला की शिक्षणात अडथळे वाढतात. अशीच अवस्था रोहा तालुक्यातील आतोणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची झाली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून ही शाळा एका समाजमंदिरात भरते आहे. पाऊस आला की फरशी ओली होते. वारा सुटला की वह्या, पुस्तके फाटतात. आदिवासी समाजातील मुले शिक्षण प्रवाहात येण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, भौतिक सुविधांअभावी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शाळेतील दोन शिक्षकांच्या जिद्दीमुळे ही शाळा सुरू आहे.

रोह्यापासून २३ कि.मी. पूर्वेला सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत आतोणे हे छोटेसे गाव वसले आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ५७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावात पूर्वी शाळेची इमारत होती. मात्र, देखभाल-दुरुस्तीअभावी तिची दुरवस्था झाली आहे. तीन-चार वर्षांपासून इमारतीची पूर्णपणे जीर्णावस्था झाल्याने आतोणे आदिवासीवाडीतील समाजमंदिरात शाळा भरतेय. ५७ विद्यार्थी इथे शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

कोकणात जवळपास चार महिने पावसाळा असतो. समाजमंदिराचे गळके पत्रे व खिडक्यांना दारे नसल्याने पाणी आत येते, त्यामुळे व मुलांना बसण्यापासून ते दुपारचे पोषण आहार खाण्यापर्यंत कसरत करावी लागते. स्वच्छतागृहाअभावी विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. या ठिकाणी किचनशेड नसल्याने एका झोपडीत माध्यान्ह भोजन शिजवले जाते. ज्या ठिकाणी ३० मुले मोकळेपणाने बसू शकत नाहीत, त्याठिकाणी आज ५७ विद्यार्थी दाटीवाटीत बसताहेत, तेही वेगवेगळ्या इयत्तेतील शाळेचे नूतनीकरण व्हावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतीने अनेकदा प्रस्ताव दिले आहेत. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अनेक अडचणी असतानाही आदिवासी मुलांच्या शिक्षणात खंड येऊ नये, यासाठी केंद्रप्रमुख प्रमोद चवरकर यांच्या व मुख्याध्यापक गजानन जाधव व सहायक शिक्षक जगन्नाथ अब्दागिरे हे शिक्षक जीवाचे रान करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.

शाळा मोडकळीस आल्याने सध्या वाडीवरील समाजमंदिरात भरत आहे. शाळेअभावी विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तरी शासनाने लवकरच ही समस्या मार्गी लावावी.
- गजानन जाधव, मुख्याध्यापक

आतोणे शाळेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविलेला आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होऊन शाळेच्या कामास प्रारंभ होईल.
- साधुराम बांगारे,
गट शिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, रोहा

आतोणे शाळेप्रमाणे जिल्ह्यातील ज्या ज्या शाळांच्या इमारती नादुरुस्त व जीर्णावस्थेत आहेत, अशा शाळांची दुरुस्ती जिल्हा नियोजनामधून व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- दयाराम पवार,
जिल्हा परिषद सदस्य,
आंबेवाडी गट, रोहा

Web Title: Lessons of falling education in the Samaj Mandir, school situation in Atone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.