जयंत धुळप।अलिबाग : गेली ३० वर्षे खारभूमी विभागाने अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील जमिनी नापीक केल्यामुळे शेतक-यांना गेल्या ३० वर्षांच्या नुकसानभरपाईसह शेती संरक्षक बंधारे, निक्षारीकरणाची निचरा व्यवस्था आणि पक्के शेतरस्ते तयार करून मिळावे, या प्रमुख मागणीसह खारभूमी नुकसानीस नैसर्गिक आपत्ती घोषित करणे, अंबा खोरे कोलाड रायगड येथील गोडे पाणी समुद्रात न सोडता, शेतीस देणे आणि पर्यायी विकास शेतीअंतर्गत, एकाच वेळी तीन पिकांचा प्रकल्प समजून घेणे, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारच्या स्वातंत्र्यदिनी अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील उधाणग्रस्त १००० शेतक-यांनी आपली मागणीपत्रे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा संघटक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.गेल्या ३० वर्षांपासून आमच्या जवळ असलेले नवसंशोधन आम्ही देशासाठी देण्यास तयार आहोत. ‘पाण्याखाली मासे, वरती भाताचे पीक व बांधांवर सोलर वीजनिर्मिती’ असा एकाच जमिनीतून, एकाच वेळी तीन पिकांचा प्रकल्प आम्ही आपणास देऊ इच्छितो. आमच्याकडे पदवी नाही म्हणून आमचा प्रकल्प नाकारू नका. खारेपाटातील शेतकºयांनी गेल्या ३० वर्षांत आत्महत्या केली नाही म्हणून आम्ही शेतकरी नाहीत, अशी समजूत करून घेऊ नका, असा इशारा या पत्रांमधून स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आला आहे.नुकसानभरपाईची मागणीखारेपाटातील शेती ३० वर्षे अनुत्पादक आहे. त्यामुळे शेतकºयांना कर्जमुक्तीबरोबर प्रतिएकरी ५० हजार रुपयांप्रमाणे ३० वर्षांची पंधरा लाख रु पये नुकसानभरपाई द्यावी, तसेच येथे खाड्यांचे बंधारे व दळणवळणासाठी पक्के शेतरस्ते तयार करून मिळावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.>खारे पाणी घुसून शेती नापीक१९७९मध्ये खारलँड कायदा अस्तित्वात आल्यानंतर संरक्षक बंधारे जे पूर्वी गावकी श्रमदानातून बांधत होते, ते काम खारभूमी विभाग करू लागले. खारभूमीचे अलिबाग तालुक्यात २३ हजार हेक्टर लाभ क्षेत्र तयार झाले असून व ते शासकीय राजपत्राद्वारे घोषित झाले. काही बांध खारभूमी विभागाने ताब्यात घेतलेच नाहीत. बांध बांधण्यासाठी कंत्राटदार आले. कामे न होता बिले निघाली. अलिबाग तालुक्यातील ७ हजार हेक्टर खारभूमी क्षेत्रापैकी ३०३६ हेक्टरपेक्षा जास्त सुपीक क्षेत्र, खारभूमी विभागाने १९८२ सालापासून संरक्षक बंधारे दुरु स्त न केल्यामुळे खारे पाणी घुसून नापीक केले आहे.>३० वर्षांत ४५ लाख दिवसांचा रोजगार बुडाला३० वर्षांच्या कालखंडात १८ लाख क्विंटल भाताचे (तांदळाचे) उत्पादन होऊ शकले नाही. तसेच ४५ लाख दिवसांचा रोजगार बुडाला. सरासरी १८ लाख क्विंटल माशांचे उत्पादन होऊ शकले नाही, असे गणित या पत्रात मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे.
शेतक-यांची मुख्यमंत्र्यांना पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 4:59 AM