जिल्ह्यातील सहा नद्यांनी गाठली धोक्याची पातळी, सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:44 AM2019-06-30T00:44:33+5:302019-06-30T00:45:38+5:30
शनिवारी पुन्हा धुंवाधार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्याला गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहा नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. धुंवाधार पाऊस आणि भरतीमुळे नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नदी आणि खाडीकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी पुन्हा धुंवाधार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेहमी ७ जूनला बरसणा-या पावसाचे २७ जून रोजी उशिराने आगमन झाल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत चालले होते, तर दुसरीकडे बळीराजाही पावासाच्या प्रतीक्षेत होता. मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने पावसाला सुरुवात होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील राब पाण्याअभावी करपण्याचा धोका निर्माण झाला होता.
२७ जूनपासून पावसाने पुन्हा दमदार कमबॅक केले. त्या दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली नाही. सातत्याने पडणाºया पावसामुळे रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी नद्यांही दुथडी भरून वाहत आहेत. २७ आणि २८ जूनच्या नद्यांनी अक्षरश: रौद्ररूप धारण केले. सद्यस्थितीमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.
सलग पडणारा पाऊस आणि समुुद्राला येणाºया भरतीमुळे नद्यांमधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. पुढील २४ तासांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाऊस असाच मुसळधार कोसळत राहिल्यास नद्या धोक्याची पातळी ओलांडतील, असा इशाराही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने प्रशासनाने नदी आणि खाडीकिनारी असलेल्या गावांना, शहरांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. प्रचंड पडलेल्या पावासाने अलिबाग, रसायनी, माणगाव, रोहे, महाड, पेण, नागोठणे चांगलेच जलमय झाले आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना चांगलाच त्रास होत आहे.
माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाणी शिरल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचे हाल सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनालाही सेवा देताना कसरत करावी लागत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी येथे दरडी पडल्याने काही कालावधीसाठी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
शनिवारीही पावसाने उसंत न घेतल्याने नागरिकांचे सलग तिसºया दिवशीही प्रचंड हाल झाले. दरम्यान, पुढील २४ तासांमध्ये रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईमध्ये धुंवाधार पाऊस बरसणार आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पावसाचे रौद्ररूपही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे १ जुलै रोजीही तुफान पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शेखाडी मार्गावर दरड कोसळली
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाºयालगत असणाºया दिवेआगर-शेखाडी मार्गावरील कोंडविल येथे शनिवारी मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. याबाबतचे वृत्त २७ जून रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, तरीही प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आलेले नाहीत. शेखाडी मार्गावरील १७ किलोमीटरचा प्रवास पर्यटकांना नेहमीच सुखकर वाटतो. त्यामुळे या मार्गावर पर्यटकांची कायम वर्दळ असते. शुक्रवारपासून पडणाºया पावसामुळे कोंडविल येथे रस्त्यालगत दरड कोसळली. मात्र, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला नाही.
दरड कोसळण्याची माहिती श्रीवर्धन बांधकाम विभागास मिळाल्यावर शेखाडी रस्त्यावरील दरड हटवण्यात आली आहे. यापुढे विभागाकडून आपत्कालीन दखल घेतली जाईल.
- सी. टी. जेट्टे, सा. बां. वि.
अधिकारी, श्रीवर्धन.
दरवर्षी पावसाळी येथे दरड कोसळल्याने प्रवासी श्रीवर्धनला जाण्यासाठी आमच्या शेखाडी मार्गे मिनीडोअरमध्ये बसत नाहीत, त्यामुळे आमच्या धंद्यावर खूप परिणाम होतो, तरी संबंधित अधिकाºयांनी यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.
- प्रवीण पुसाळकर, मिनीडोअर चालक.