कुंडलिका नदीची पातळी वाढली; पावसाचा जोर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:18 AM2020-06-20T00:18:12+5:302020-06-20T00:18:19+5:30
रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ३६०.५० मिमी पावसाची नोंद
अलिबाग : रायगड जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीखाली वाहत आहे. शुक्र वारी (१९ जून) सकाळी १० वाजता नोंदविलेल्या जिल्ह्यातील या नद्यांच्या पाणी पातळीच्या अहवालानुसार, कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळी ही २२.१० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे.
कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या प्रमुख नद्या आहेत. रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ३६०.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोह्यातील कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळी शुक्रवारी २२.१० मीटर नोंदली गेली आहे. ही नदी धोका पातळीच्या खाली वाहत असली, तरी धोका पातळीपासून फार दूर नाही. नदीची इशारा पातळी डोलवहाळ बंधारा येथे २३ मीटर असून, धोका पातळी २३.९५ मीटर आहे. त्यामुळे २२.१० मीटर इतक्या पाणी पातळीवरून वाहणाºया नदीच्या सद्य:स्थितीचा अंदाज येतो. अंबा नदीची पाणी पातळी ६.२५ मीटर, सावित्री नदी ३ मीटर, पाताळगंगा नदी १८ मीटर, उल्हास नदी ४२ व गाढी नदी १.१० मीटर पातळीवरून वाहत आहे.
चोवीस तासांतील पाऊस : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत अलिबाग तालुक्यात ४३ मिमी, पेणमध्ये ३४.२० मिमी, मुरु डमध्ये ३४ मिमी, पनवेल ४०.४० मिमी, उरणमध्ये १७ मिमी, कर्जत १३ मिमी, खालापूर १० मिमी, माणगांव १६ मिमी, रोहा २८ मिमी, सुधागड ९ मिमी, तळा २४ मिमी, महाड २.८० मिमी, पोलादपूर ७ मिमी, म्हसळा २३ मिमी, श्रीवर्धन १६ मिमी, तर माथेरानमध्ये ४३.२० मिमी असा एकूण २२.५३ मिमीच्या सरासरीने ३६०.५० मिमी पाऊस नोंदविण्यात आला.