सात धरणांची पातळी घटली

By admin | Published: April 18, 2016 12:36 AM2016-04-18T00:36:29+5:302016-04-18T00:36:29+5:30

गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांमध्ये केवळ ५९ टक्केच पाणी जमा झाले होते. त्यातच आता उन्हाची दाहकता अधिक प्रमाणात वाढली आहे. या एकत्रित

The level of seven dams decreased | सात धरणांची पातळी घटली

सात धरणांची पातळी घटली

Next

- आविष्कार देसाई, अलिबाग

गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांमध्ये केवळ ५९ टक्केच पाणी जमा झाले होते. त्यातच आता उन्हाची दाहकता अधिक प्रमाणात वाढली आहे. या एकत्रित परिणामामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये २३.७४६ द.ल.घ.मी (दशलक्ष घनमीटर) पाणी शिल्लक आहे. कोथुर्डे, रानिवली, आंबेघर, पुनाडे, खैरे, वरंध आणि साळोखे या सात धरणांमध्ये ४ ते १९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना या धरणातून पाणी खरवडून घेण्याची वेळ आली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये लघुपाटबंधारे विभागांतर्गत २८ धरणांचा समावेश होतो. या सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता ही ७१.५७५ द.ल.घ.मी. आहे. ६८.२८६ द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा वापरण्याजोगा आहे. कमी पडलेला पाऊस आणि वातावरणात वाढलेल्या उष्णता आणि धरणातील न काढलेल्या गाळामुळे पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. या धरणांच्या माध्यमातून पिण्याबरोबरच उन्हाळी शेतीसाठीही पाण्याचा वापर केला जातो. नजीकच्या कालावधीमध्ये धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घसरण होणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच उन्हाळी शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवणार आहे. या परिसरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत.
पाणीसंकटातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आधीच एक हजार ८६६ गाव-वाड्यांसाठी सात कोटी ८८ लाख रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याचे नियोजन केले आहे. मात्र प्रशासनाची ही उपाययोजना म्हणजे तात्पुरती असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अस्तित्वात असणाऱ्या डोंगरांवरील कॅचिंग पॉइंटवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जेणेकरुन कॅचिंग पॉइंटवरील पाण्याचे योग्य नियोजन करून परिसरातील नद्यांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. तसेच त्या नद्यांवर छोटी धरणे बांधणे गरजेचे असल्याचेही भगत यांनी स्पष्ट केले.
यंदा मान्सून लवकर दाखल होणार असतानाच ‘तो जमके बरसणार’ असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. परंतु एप्रिल महिन्याचे १५ दिवस आणि संपूर्ण मे महिना अद्याप शिल्लक आहे.

पाण्याचे गणित
१ दशलक्ष घनमीटर म्हणजे १० लाख क्युबिक मीटर, १ क्युबिक मीटर म्हणजे १००० लिटर. २८ धरणांमध्ये २३.७४६ दलघमीप्रमाणे २ कोटी ३७ लाख ४६ हजार दलघमी पाणी आहे. याचाच अर्थ म्हणजे २३ अब्ज ७४ कोटी ६० लाख लिटर पाणी शिल्लक आहे. परंतु धरणाची साठवण क्षमता ही ६८.२८६ दलघमी आहे. यातील तफावत ही ४४.५४ दलघमीची आहे. म्हणजेच ४४ अब्ज ५४ कोटी लिटर धरणाच्या पाणीसाठ्यात पाण्याच्या नावाने ठणठण आहे.

पाण्याची स्थिती
२०१५ साली याच तारखेला ३२.४२५ दलघमी पाणी शिल्लक होते, तर २०१४- ३३.५३९ दलघमी, २०१३- ३०.३४६, २०१२-३०.५९८ दलघमी आणि २०११ साली ३४.५६६ दलघमी पाणी शिल्लक होते.
पाणी जपून वापरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. नागरिकांनीही पाणी वापरायचे योग्य नियोजन न केल्यास नागरिकांचे पाण्यासाठी हाल होणार आहेत.

Web Title: The level of seven dams decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.