नियम मोडणाऱ्यांचा परवाना तीन महिने रद्द
By admin | Published: January 25, 2016 01:26 AM2016-01-25T01:26:08+5:302016-01-25T01:26:08+5:30
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा परवाना ३ महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल, असा इशारा पनवेलचे परिवहन उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी दिला आहे.
खालापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा परवाना ३ महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल, असा इशारा पनवेलचे परिवहन उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी दिला आहे. मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर आयोजित केलेल्या राज्य रस्ते सुरक्षा अभियानाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी गगनगिरी आश्रमाचे विश्वस्त आशिषभाई यांच्यासह उपप्रादेशिक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पनवेल लायन्स क्लबचे पदाधिकारी व वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभाग, रोटरी क्लब पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोल नाका येथे राज्य रस्ते सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित केला होता.
वाहनचालक नियम पाळत नसल्याने रस्ता अपघातांची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. रस्ता अपघातांमध्ये दर चार मिनिटाला एकाचा मृत्यू होत असून, ही चिंताजनक बाब आहे. अपघातांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज असून, मद्यप्राशन, सीटबेल्ट, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक परवाने ३ महिन्यांसाठी रद्द करणार असल्याचे आनंद पाटील यांनी सांगितले. समाजाची मानसिकता ढासळत आहे. सर्वांची सुरक्षितता हेच जीवन मानले पाहिजे, असे मत डॉक्टर गिरीश गुणे यांनी व्यक्त केले.
आजकालचे जग वेगवान झाले आहे. कुणालाही थांबायला वेळ नाही. त्यामुळे मन शांत ठेवून वाहने चालवा. इच्छित ठिकाणी पोचायला वेळ लागला तरी चालेल पण वाहने नियम पाळून चालवा, असे आवाहन गगनगिरी आश्रमाचे मुख्य विश्वस्त आशिषभाई यांनी केले. याप्रसंगी पनवेल रोटरी क्लबचे अध्यक्ष हितेन शाह, साहाय्यक अधिकारी सुरेंद्र निकम, आयआरबीचे अधिकारी गांधी यांच्यासह वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.