लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरुड : मुरुड शहरातील कोटेश्वरी मंदिरानजीक मंगेश भायदे यांच्या निवासस्थानी कोंबड्यांच्या खुराड्यात पहाटेच्या समयी अजगराने प्रवेश करून दोन कोंबड्या गिळंकृत करून एका कोंबडीला ठार केले. तेवढ्यात भायदे यांना जागा आल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकारामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले असून, याबाबत त्यांनी वनखात्याला सजग राहण्यास सांगितले आहे.मंगेश भायदे यांनी वेळ न जाऊ देता त्वरित सर्पमित्र संदीप घरत यांना पाचारण करून अजगरास पकडण्याची विनंती केली. सर्पमित्र यांनी तातडीने भायदे यांच्या निवासस्थानी जाऊन या अजगरास पकडले व तातडीने वनाधिकाऱ्यांना पाचारण केले. वनक्षेत्रपाल राकेश भोईर यांच्या समवेत वनरक्षक सुनील वटलवार यांनी या अजगराला ताब्यात घेऊन सर्पमित्र घरत यांच्या समवेत गारंबी जंगलात सुखरूप सोडण्यात आले. वनरक्षक वटलवार यांनी या अजगराचे वजन १२ किलो व तो आठ फूट लांब असल्याचे सांगितले. अशा प्रसंगी सर्पमित्र घरत यांच्याबरोबर संपर्कसाधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
अजगराला जीवनदान
By admin | Published: July 17, 2017 1:28 AM