जीवनावश्यक साहित्यासाठी 'जीव धोक्यात'!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:33 PM2021-04-21T23:33:10+5:302021-04-21T23:33:25+5:30
सामाजिक अंतराचा पडला विसर : संचारबंदीच्या भीतीने नागरिकांची बाजारात गर्दी, मात्र सकाळी ११ नंतर शुकशुकाट
अलिबाग : जिल्ह्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, कनफेक्शनरी, सर्व खाद्य दुकाने, कृषी उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहणार असली तरी या दुकानांना घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ८ पर्यंत मुभा असेल. जिल्ह्यात बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडताच नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची वाढती चेन ब्रेक करण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध लागू केलेले असतानाही किराणा खरेदीच्या नावाखाली नागरिक दिवसभर बाहेर फिरत आहेत. त्यामुळे २० एप्रिलपासून किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली असल्याने नागरिक सकाळपासूनच गर्दी करीत होते. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेतही नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती. साहित्य घेण्याच्या नादात सामाजिक अंतराचाच विसर पडल्याचे दिसून आले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.
आठ ते पंधरा दिवसांच्या सामानाची तरतूद घरात करावी यासाठी किराणा दुकान, सुपर मार्केट, भाजी मार्केट, फळ बाजार, मासळी बाजार येथे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडाला. संचारबंदीच्या भीतीने नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. मात्र, कोरोना काळात सुरक्षित अंतर राखणे गरजेचे असताना कुठेही या नियमांचे पालन होताना दिसत नव्हते. किराणा दुकान, भाजी, फळे, मासळी बाजारात नागरिकांकडून आणि दुकानदारांकडून सुरक्षित अंतराच्या नियमांचा फज्जा उडताना दिसत होता. त्यामुळे, या गर्दीने कोरोना रुग्ण वाढण्याची भीती वाढली आहे.
nकिराणा दुकाने
nदूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री
nभाजीपाला विक्री
nफळे विक्री
nअंडी, मटण, चिकन, मासे विक्री
nकृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने
nपशुखाद्य विक्री
nबेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने
nपाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने
nयेणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने