जीवनाश्यक वस्तूंसाठी ‘जीव धोक्यात’; एपीएमसीमध्ये पुन्हा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:04 AM2020-07-28T00:04:30+5:302020-07-28T00:05:01+5:30
सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर; नियमबाह्यपणे किरकोळ विक्रीही सुरू
नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये खरेदीसाठी पुन्हा प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात असून, नियमबाह्यपणे किरकोळ विक्रीही सुरू झाली आहे. जीव धोक्यात घालून जीवनाश्यक वस्तूंची खरेदी सुरू असून, याकडे प्रशासनाचेही पुन्हा दुर्लक्ष होऊ लागले आहे.
श्रावण महिना सुरू झाल्यामुळे भाजीपाला व फळांना मागणी वाढली आहे. यामुळे बाजारसमितीमध्ये आवकही वाढू लागली आहे. सोमवारी पाचही मार्केट्समध्ये ७९१ वाहनांमधून तब्बल ७,९८१ टन कृषिमाल विक्रीसाठी आला. यामध्ये ८९१ टन भाजीपाला व १,४८६ टन फळांचाही समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सर्वाधिक फटका भाजीपाला व फळ मार्केटला बसला आहे. येथील अनेक प्रतिथयश व्यापारी व कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मार्केटमध्ये गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, परंतु काही दिवसांपासून हे नियम धाब्यावर बसवून पूर्ववत गर्दी जमविण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी भाजीपाला मार्र्केटमध्ये अनधिकृत किरकोळ विक्रीही सुरू झाली आहे. शेकडो नागरिकांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली होती. वास्तविक, एपीएमसीमध्ये किरकोळ विक्री करण्यास परवानगी नाही. ज्यांच्याकडे खरेदीसाठीची परवानी नाही, अशांना मार्केटमध्ये प्रवेश देण्यास मनाई आहे. यानंतरही किरकोळ विक्री करणाऱ्यांना व खरेदीदारांना आतमध्ये कसे सोडले, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मार्र्केटमधील दोन विंगमध्ये किरकोळ विक्रीमुळे प्रचंड गर्दी झाल्याचे सोमवारी पाहावयास मिळाले. स्वस्त भाजी मिळविण्यासाठी नागरिक जीव धोक्यात घालत आहेत.
भाजीपाला मार्केटमधील गर्दी थांबविली नाही, तर एपीएमसीमधील व संपूर्ण नवी मुंबईमधील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजारसमिती प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी होत आहे. सोमवारी मार्र्केटच्या बाहेर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. कांदा, मसाला व धान्य मार्केटमध्ये गर्दी आटोक्यात असली, तरी तेथेही नियमांचे उल्लंघन होऊ लागले आहे. मार्केटमधील अनेक नागरिक अद्याप मास्कचा वापर करत नाहीत. सॅनिटायझर व इतर उपाययोजनाही केल्या जात नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही.
किरकोळ विक्रीला अभय कोणाचे
१कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजीपाला मार्केटमधील किरकोळ विक्री बंद केली होती. बाजारसमितीचा परवाना नसताना अनधिकृत हा व्यापार सुरू होता. काही दिवसांपासून किरकोळ विक्री पुन्हा सुरू झाली असून, मार्र्केटमधील गर्दी त्यामुळे वाढली आहे. या अनधिकृत व्यापाऱ्यांना अभय देणाºयांना व गाळे भाडेतत्त्वावर देणाºयांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
एक महिना आवक वाढणार
२श्रावण महिना सुरू झाल्यामुळे भाजीपाला व फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. यामुळे पुढील एक महिना दोन्ही मार्केट्समध्ये आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवले नाही व सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही, तर या काळात कोरोनाचा प्रादुर्भावही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रुग्णवाहिका अडकली
३एपीएमसीमधील आवक वाढल्यामुळे मार्केटमध्ये येणाºया व येथून माल घेऊन बाहेर जाणाºया रोडमुळे मार्केटबाहेरील रोडवर चक्काजामची स्थिती झाली होती. या रोडवर रुग्णवाहिकाही अडकली होती. काही दक्ष नागरिकांनी रुग्णवाहिकेला जागा करून दिली.
एपीएमसीमधील व्यापारी व सर्व घटकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. भाजीपाला मार्केटमधील किरकोळ विक्री व नियम मोडणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- अनिल चव्हाण, सचिव,
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती
जीवाची काळजी घ्यावी
च्भाजीपाला मार्केटमध्ये अनेक प्रतिथयश व्यापाºयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यभरातील जवळपास ५०० शेतकºयांना नियमित काशी यात्रेला घेऊन जाणाºया व्यापाºयाचाही मृत्यू झाला आहे.
च्एकाच कुटुंबामधील पिता-पुत्रांचेही निधन झाले आहे. यामुळे कामगार, व्यापारी व खरेदीदार यांनी योग्य काळजी घ्यावी, स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन दक्ष नागरिकांनी केले आहे.