धनाजी किसन काळे याला जन्मठेप

By admin | Published: July 2, 2017 06:13 AM2017-07-02T06:13:38+5:302017-07-02T06:13:38+5:30

उरण तालुक्यातील बोकडविरा येथील एम. एस. ई. बी. झोपडपट्टीमध्ये राहाणारे अमोल गिरीजाप्पा भालेराव यांच्या खून प्रकरणी, त्याच्याच

Life imprisonment to Dhanaji Kisan Kale | धनाजी किसन काळे याला जन्मठेप

धनाजी किसन काळे याला जन्मठेप

Next

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : उरण तालुक्यातील बोकडविरा येथील एम. एस. ई. बी. झोपडपट्टीमध्ये राहाणारे अमोल गिरीजाप्पा भालेराव यांच्या खून प्रकरणी, त्याच्याच शेजारी राहणारा धनाजी किसन काळे याला अलिबाग येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवून शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
६ मार्च २०१५ रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान गिरीजाप्पा भालेराव यांच्या घराशेजारी राहणारे आरोपी धनाजी काळे व किसन काळे हे त्यांच्या घरी जोरजोरात गाणी बोलत होते. अमोल भालेराव याने त्यांच्या घरी जाऊन त्यांना, गाणी हळू बोला, मला कामावर लवकर जायचे आहे, असे म्हटल्याने आरोपी धनाजी काळे व किसन काळे यांनी अमोल भालेराव याला शिवीगाळ करून हाताबुक्क्याने मारहाण करून आरोपी धनाजी किसन काळे याने त्याच्या घरातील चाकू आणून यातील अमोल भालेराव याच्या पोटावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास प्रथम उपचाराकरिता उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे नेले व तेथून मुंबईत सायन हॉस्पिटल येथे पाठविले. तेथे उपचारादरम्यान अमोल भालेराव यांचा मृत्यू झाला. परिणामी, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खटल्याची सुनावणी रायगड जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु. गों. सेवलीकर यांच्या न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. अमित देशमुख यांनी सात साक्षीदारांची साक्ष नोंदविली. मृत अमोल भालेराव यांची बहीण प्रियांका भालेराव व वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश चंद्रकांत डेरे व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकारी पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. अमित देशमुख यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद व दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी धनाजी किसन काळे (२२ वर्षे) याला भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये दाखल गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर त्याचा भाऊ किसन काळे यास भा.द.वि.कलम ३२३अन्वये दोषी ठरविले. त्याने भोगलेला कारावास पुरेसा असल्याने त्याची मुक्तता केली आहे.

Web Title: Life imprisonment to Dhanaji Kisan Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.