अलिबाग : रोहा तालुक्यातील सोनखार-न्हावे येथील विनिता गणेश दिवकर हिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन तिचा खून केल्या प्रकरणी चार महिलांना माणगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. जमा होणाऱ्या दंडाच्या रकमेपैकी ३० हजार रुपये विनिताचा मुलगा प्रथमेश यास नुकसानभरपाई म्हणून देण्याचाही निर्णय न्यायालयाने दिला आहे.
विनिता दिवकर यांचे पती गणेश दिवकर आणि आरोपी सविता ऊर्फ मनाली मीननाथ कटोरे, कमलाय महादेव बसवत, ललिता प्रदीप पाटील या नात्याने नणंद आहेत व सुरेखा ऊर्फ प्रणाली पांडुरंग दिवकर या मृत विनिताच्या जाऊ आहेत तर पांडुरंग जानू दिवकर हे दीर आहेत. तक्रारदार गणेश दिवकर व आरोपी सुरेखा दिवकर व पांडुरंग दिवकर हे वडिलोपार्जित घरात वेगवेगळे राहतात. दोन्ही घरांमध्ये एकच सामाईक इलेक्ट्रीक मीटर असून तो सुरेखा व पांडुरंग यांच्या खोलीमध्ये आहे. मीटरचे येणारे लाइट बिल व घरपट्टी विनिताचे पती गणेश दिवकर व पांडुरंग दिवकर हे अर्धेअर्धे भरत. ४ सप्टेंबर २०१२ रोजी विनिता हिला पांडुरंग दिवकर याने इलेक्ट्रीकचे बिल दाखविले. त्यावेळी बिल व घरपट्टी भरण्यावरून वाद झाला. त्यावेळी विनिता हीस शिवीगाळ करून नंतर आणि सविता कटोरे, कमलाय बसवत, ललिता पाटील, सुरेखा दिवकर या तीन आरोपींनी विनितास पकडून ठेवले तर सुरेखा दिवकर हिने विनिताच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याने तिचा मृत्यू झाला.