- जयंत धुळपरायगड- तळा तालुक्यातील राहाटाड गावातील पांडुरंग सुर्वे यांच्या खूनप्रकरणी सहदेव नारायण खंडागळे यांस दोषी ठरवून, त्यास भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास आणि भादंवि कलम 452 अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश टी. एम. जहागिरदार यांनी मंगळवारी सुनावली आहे.तळा पोलीस ठाणे हद्दीतील भागाड येथे आरोपी सहदेव नारायण खंडागळे आणि मृत पांडुरंग सुर्वे याच्यात पंखा दुरुस्तीच्या कारणावरून आधी भांडण झाले होते. त्यानंतर 11 जुलै 2015 रोजी आरोपी सहदेव नारायण खंडागळे व त्याचा अज्ञान मुलगा यांनी पांडुरंग सुर्वे यांच्या घरी जाऊन सुर्वे यांना त्यांच्या घरातून अंगणात खेचून आणून त्यांना कोयत्याने व काठीने डोक्यावर मोठ्या व गंभीर दुखापत केली. त्यामध्ये पांडुरंग सुर्वे यांचा मृत्यू झाला. हे भांडण सोडविण्यासाठी मृत सुर्वे यांच्या पत्नी गेल्या असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण केली.या खूनप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास तळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर.बी. चौधरी यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी माणगाव सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश टी. एम. जहागिरदार यांच्या समोर झाली. या खटल्यामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. जितेंद्र द. म्हात्रे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. खटल्याच्या सुनावणीत समोर आलेल्या साक्षी व पुराव्यांना ग्राह्य धरून न्यायालयाने सहदेव नारायण खंडागळे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.दरम्यान या खुनाच्या गुन्ह्यात सहदेव नारायण खंडागळे यांच्या अल्पवयीन मुलाचाही सहभाग होता. त्याच्यावरील खटला कर्जत येथील बाल गुन्हे न्यायालयात दाखल आहे. त्याचा निकाल अद्याप झालेला नसल्याची माहिती सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड.जितेंद्र द. म्हात्रे यांनी दिली आहे.
पांडुरंग सुर्वे खूनप्रकरणी सहदेव नारायण खंडागळेला जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2018 5:18 PM