मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:08 AM2018-06-26T02:08:28+5:302018-06-26T02:08:31+5:30

वाकण ते पाली फाटा या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे

Life-threatening disruption due to torrential rains | मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Next

पाली : वाकण ते पाली फाटा या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. रस्ता तयार करताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधलेल्या मोऱ्यांसाठी मोठे पाइप टाकण्यात आले आहेत. मात्र जुन्या रस्त्याला असलेल्या लहान मोºया पाण्याचा जोरदार प्रवाह सहन न करू शकल्याने जुने पाइप पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आजूबाजूचा रस्ता खचून भगदाड पडले आहे. पालीचे तहसीलदार बाबूराव निंबाळकर आणि पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र रस्ता खचून चार तास उलटले तरी एमएसआरडीचे अधिकारी आणि कंत्राटदार पाहणीसाठी आले नाहीत.
रस्ता वाहून गेल्याने राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद पडल्याने वाहनांची रांग लागली होती. रस्त्यातील माती आणि पाइप काढण्याचे काम सुरू केले असून पर्यायी मार्ग काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. रस्ता वाहून गेल्याने मोरीचे काम करण्यासाठी वेळ लागू शकतो.
पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून सद्यस्थितीत अत्यंत धोकादायक व जीवघेणा बनला आहे. एमएसआरडीसीच्या गलथान कारभाराविरोधात लोकशाही व सनदशीर मार्गाने सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी रस्ता वाहतुकीला व्यवस्थित करून देऊ असे आश्वासन एम.एस.आर.डी.सी.एल.चे अधीक्षक अभियंता कर्नल रवींद्र घोडके, कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, डेप्युटी इंजिनिअर सचिन निफाडे यांनी दिले होते. या घटनेला चार दिवस होत नाही, तोपर्यंत रस्ता वाहून गेला आहे. रुंदीकरणाचे काम सुरू असताना खोदकामात रस्ता खचत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मार्गावरील अवजड वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील पावसाची नोंद
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ९८.४९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली
आहे. तालुकानिहाय पडलेला पाऊस अलिबाग १५५.०० मि.मी., पेण-१६०.०० मि.मी., मुरु ड-६०.०० मि.मी., पनवेल-१५८.५० मि.मी., उरण-१०६.०० मि.मी., कर्जत-८६.३० मि.मी., खालापूर-७१ मि.मी., माणगाव-७० मि.मी., रोहा-११० मि.मी., सुधागड-७७ मि.मी., तळा-१३० मि.मी., महाड-३८ मि.मी., पोलादपूर-५०, म्हसळा-१०५ मि.मी., श्रीवर्धन-४४ मि.मी., माथेरान-१५५ मि.मी. नोंदविण्यात आला आहे.

मोहोपाडा : रसायनीसह इतर भागात रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पावसाला सुरु वात होताच अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. सोसाट्याच्या वाºयामुळे पावसाने रविवार रात्रीपासून सोमवारी पूर्ण दिवस चांगलेच झोडपून काढले. यावेळी दांड-रसायनी रस्त्यावरील काही झाडे उन्मळून पडली, तर मोहोपाडा बाजारपेठेत काही ठिकाणी रस्त्याशेजारील दुकानांचे नामफलक कोसळले. सोमवारी रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. रसायनी पाताळगंगा परिसराच्या मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदू असणाºया मोहोपाडा बाजारपेठेत सोमवारी पूर्ण दिवस शुकशुकाट जाणवला.

वेळास-आदगाव रस्ता खचतोय
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव मार्गावरील मुसळधार पावसामुळे रस्ता खचला आहे. याशिवाय रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये नाराजी आहे. श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन दृष्टिकोनातून प्रमुख समुद्रकिनारे आहेत. त्यामध्ये श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, कोंडविल या किनाºयांबरोबरच वेळास व आदगाव समुद्रकिनाराही पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे. मात्र वेळास-आदगाव मार्ग खड्डेमय झाला असून रस्त्याला आणखी मोठे भगदाड पडण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

विरेश्वर उद्यानाची सुरक्षा भिंत कोसळली
खोपोली : वरची खोपोली येथे एक कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या विरेश्वर उद्यानाची भिंत उद्घाटनापूर्वीच कोसळल्यामुळे उद्यानाच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उद्यानाची भिंत कोसळली. सलग दोन विधानपरिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे उद्यानाचे उद्घाटन लांबणीवर पडले, अन्यथा मे महिन्यामध्येच या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. जर उद्घाटन झाले असते तर निकृष्ट बांधकामामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. स्थानिक नगरसेविका माधवी रिठे व जिनी सॅम्युअल यांनी नगरपरिषद सभागृहात वेळोवेळी विरेश्वर उद्यान व महावीर उद्यानाच्या कामाबाबत होत असलेली दिरंगाई व कामाचा दर्जा याबाबत आवाज उठवला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी उद्घाटनापूर्वीच उद्यानाची भिंत कोसळली.
 

Web Title: Life-threatening disruption due to torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.