जेएसडब्ल्यू कंपनीकडून जीवितास धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:38 AM2020-09-20T00:38:33+5:302020-09-20T00:38:39+5:30
भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांची पोलीस संरक्षणाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जेएसडब्ल्यू कंपनीने कांदळवनाची केलेली कत्तल आणि खाडीमध्ये अवैध भरावाबाबतची तक्रार भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड.महेश मोहिते यांनी केली होती. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी वन प्रशासनाने स्थळपाहणी अहवालाची प्रक्रिया राबवली होती, परंतु स्थानिकांनी ती कंपनीच्या इशाऱ्यावर उधळून लावली होती. या प्रकरणात कंपनीचे सर्वेसर्वा सज्जन जिंदाल आणि कंपनी प्रशासाकडून जीवितास धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड.महेश मोहिते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनामार्फत केली आहे.
संरक्षित असणाºया कांदळवनांची कत्तल करुन तसेच खाडीमध्ये बेकायदा भराव करुन जेएसडब्ल्यू कंपनी कायदा धाब्यावर बसवत आहे. याबाबत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अॅड.मोहिते यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा वनसंरक्षक यांच्याकडे केली होती. त्यानुसार, १६ सप्टेंबर रोजी वनविभागाने स्थळपाहणी करण्याचे ठरवले होते. पंचनाम्यासाठी संबंधिताना नोटीस देण्यात आली होती. जागेवर पोहोचल्यानंतर सुमारे ८० नागरिक मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कंपनीच्या सांगण्यावरूनच त्यांनी स्थळपाहणी करण्याचे रोखले. माझे सहकारी परशुराम म्हात्रे, अनंता पाटील, प्रशांत पाटील, प्रकाश पाटील यांना धमकवण्यास सुरुवात केल्याचे अॅड.मोहिते यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.
जमाव मोठा असल्याने वडखळ पोलीस ठाण्यातील एक पोलीस वन विभागाचे अधिकारी, खारभूमी विभागाचे अधिकारी हतबल झाले होते.
संबंधित कंपनीने षडयंत्र रचून स्थळपाहणीच्या सरकारी कामात अडथळा आणला आहे. कंपनीने केलेली कृत्य बाहेर काढत असल्याने, माझ्या जीवितास सज्जन जिंदाल आणि कंपनी प्रशासनाकडून धोका निर्माण झाला आहे. भाजपचा जिल्हाध्यक्ष असल्याने रात्री-अपरात्री बाहेर जावे लागते. संबंधितांकडून माझ्याबाबत घातपात होण्याची शक्यता असल्याने, सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली आहे, तसेच सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधातही कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
खारबंदिस्थीच्या सुरू असणाºया कामाबाबत कंपनीचा कसलाही संबंध नाही. स्थळपाहणी उधळून लावणारे हे स्थानिक होते. या प्रकरणात कंपनीला गोवण्यात येत आहे. आमच्या कंपनीचे मालक आणि कंपनी प्रशासन यांचे नाव उगाचच बदनाम करण्यात येत असल्याने सदरचे आरोप धादांत खोटे आहेत. -नारायण बोलबुंडा (जनसंपर्क प्रमुख, जेएसडब्ल्यू)