कर्जत : शहरातील रेल्वे स्थानका नजीक असलेल्या महावीरपेठेमध्ये शनिवारी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास एका ट्रकला वीजवाहक तारा अडकून खांब वाकला. त्या वेळी स्पार्किंग झाले आणि तेथील लोखंडी टपºयात असलेले दुकानदार व नोकर लगेच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला, सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, रात्रभर विजेविना नागरिकांना राहावे लागले.
महावीरपेठेमध्ये कापड दुकाने, सोन्याच्या पेढ्या तसेच स्टेशनलगत १९ लोखंडी टपºया आहेत. या भागात वीजवाहक तारा खाली लोंबल्या होत्या. त्याबाबत त्या परिसरातील व्यापाऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली होती. त्यानुसार वीज वितरण कंपनीचे अधिकारी येऊन पाहणी करून गेले; परंतु काहीही कार्यवाही केली नाही. श्नि
वारी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास एक ट्रक स्टेशनकडे जात असता त्याला वीजवाहक तारा अडकल्या आणि मोठ्याने स्पार्किंग झाले, त्याच वेळी खांबसुद्धा वाकला. या प्रकाराने त्या परिसरातील दुकानदार व त्यांचे कामगार घाबरून दुकानाबाहेर आले. त्या वीजवाहक तारा एखाद्या लोखंडी टपरीवर पडल्या असत्या तर संपूर्ण १९ टपºयांमध्ये असलेल्या व्यक्तींच्या जीवावर बेतले असते; परंतु त्या तारा अमित चाचड यांच्या दुकानावर लावलेल्या छत्रीवर पडल्या आणि अनर्थ टळला.
याबाबत तेथील दुकानदार व रहिवाशांनी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीमुळे हा प्रकार घडला असून आम्ही या वस्तुस्थितीची कल्पना वेळोवेळी वीज वितरण कंपनीला दिली होती; परंतु केवळ पाहणीचा फार्स केला गेला. वीज वितरण कंपनीने गांभीर्याने याकडे लक्ष दिले असते तर हा प्रकार घडला नसता आणि आता घटना घडल्यावर लगेचच कसा काय विजेचा खांब तातडीने बसविला. म्हणजे एखादी घटना घडून जीवितहानी होण्याची वाट वीज वितरण कंपनी बघते की काय? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आम्ही वेळो वेळी तारा खाली आल्याची तक्रार केली होती. केवळ पाहणी करण्याचा फार्स केला गेला. शनिवारी माझ्या दुकानासमोर उंच छत्री नसती तर आमच्या १९ टपºयांमधील माणसे मृत्युमुखी पडली असती.- अमित चाचड, दुकानदार