घरांवर कोसळले विजेचे खांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:17 AM2019-06-12T02:17:46+5:302019-06-12T02:18:10+5:30
दर्गावाडीत बैलाचा मृत्यू : वीज वितरण कं पनीचे खांब गंजलेले
पेण : तालुक्यातील बळवली ग्रामपंचायत हद्दीतील दर्गावाडी या आदिवासी वाडीवर रात्री पडलेल्या वादळी पावसात विजेचे चार खांब आदिवासींच्या घरांवर कोसळले. यातील एक सिमेंटचा खांब जवळच्या शेतात पडून या खांबाच्या वीजवाहिन्या अंगावर पडून शेतात बांधलेला बैल जागीच तडफडत मृत्यू पावला. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती सरपंच संजय डोंगर यांनी दिली. ग्रामीण भागातील असे अनेक खांब निकामी, गंजलेल्या विजेचे खांब न बदल्याने दर्गावाडीवर झालेल्या घटनेतून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोध घ्यावा अशा नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
पेणमध्ये मंगळवारी रात्री ८.३० वाजता वादळी वाºयांसह जोरदार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट, ढगांच्या गर्जनांचा आवाज व पाऊस अशी परिस्थिती होती, रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास दर्गावाडीवरील घरांवर हे विजेचे खांब कोसळले. याबाबत सरपंच संजय डोंगर यांना ही माहिती देण्यात आली त्यांनी वीज वाहिन्या प्रवाही असल्याने त्वरित वीज अधिकारी, कर्मचाºयांना कळवले. वीज प्रवाह बंद होईपर्यंत शेतात बांधलेल्या बैलाच्या अंगावर वीज वाहिन्या पडून बैलाचा जागीच मृत्यू झाला.
एकंदरीत घटनेचे प्रसंगावधान राखून सरपंच डोंगर यांनी परिस्थिती हाताळली. आदिवासींच्या जीवावर बेतलेला प्रसंग बैलाच्या जीवावर जाऊन बेतला. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच आ. धैर्यशील पाटील, जि.प. सदस्य बी.बी. पाटील, उपसरपंच गणेश पाटील यांनी दर्गावाडीवर जाऊन या आदिवासी बांधवांना प्रासंगिक मदत, व बैलाच्या मृत्यूची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांकडे केली.
नागोठणेत पाच तास वीज गायब
नागोठणे : सोमवारी वादळी वाºयामुळे विद्युत पुरवठा रात्री साडेअकरा ते पहाटे चारपर्यंत खंडित झाल्याने नागरिकांना काळोखात बसावे लागले होते. शहरात कोठेही नुकसान झाले नसल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. विद्युत पुरवठा पहिल्याच पावसात खंडित झाला असल्याने याबाबत विद्युत वितरणचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांना विचारले असता, नागोठण्यात महामार्गावर तसेच निडी गावात विद्युत वाहक तारा तुटल्यामुळे नागोठणे शहरासह विभागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता असे त्यांनी स्पष्ट केले.