कडाडणाऱ्या विजेलाही बदलावी लागणार दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:57 AM2020-08-09T00:57:55+5:302020-08-09T00:58:00+5:30
जिल्ह्यात ९८० ठिकाणी बसवणार वीज प्रतिरोधक यंत्रणा : मनुष्य आणि वित्तहानी टाळता येणार
- आविष्कार देसाई
रायगड : मान्सूनपूर्व कालावधीत अथवा पावसाळ्यामध्ये वीज अंगावर पडून मृत्यू पावणे, हे नित्याचेच झाले आहे. हकनाक होणारे मृत्यू, तसेच मालमत्तेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील ९८० ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत ही योजना आखण्यात आली आहे.
जिल्ह्यात सरासरी साडेतीन हजार मिमी पावसाची नोंद होते. मान्सूनपूर्व पडणाºया पावसाच्या वेळी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वीज पडण्याच्या घटना सातत्याने घडताना दिसून येतात. त्यामध्ये दरवर्षी सरासरी दोन नागरिकांचा बळी जात आहे, तर गुरे-ढोरे मृत होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. वीज पडून होणाºया आपत्तीमध्ये सार्वजनिक, तसेच खासगीही मालमत्तेचेही लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाखांच्या आसपास आहे. विविध प्रकल्पांमुळे नागरिकरणामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.दाटीवाटीच्या शहर-गावांमध्ये वीज पडल्यास हानी होण्याची अधिक शक्यता आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील १३ विभागांतील ९८० ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय स्तरावर पाठविण्यात आला आहे.
सर्वसाधारणपणे उंच इमारती, मोबाइल टॉवर, कंपन्यांच्या चिमण्या, वेधशाळा, उच्च दाबाच्या वीज वाहिनी टॉवर या ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. या ठिकाणच्या परिसरामध्ये वीज कोसळली, तर वीज प्रतिरोधक यंत्रणा आपल्याकडे वीज खेचून घेते. त्यानंतर, तिच्या प्रणालीच्या माध्यमातून जमिनीखाली वळविली जाते. त्यामुळे वीज पडण्याच्या घटना कमी होऊन मनुष्य आणि वित्तहानी टाळता येते. यासाठीच जिल्ह्यात वीज प्रतिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
या ठिकाणी बसविण्यात येणार वीज प्रतिरोधक यंत्रणा
जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग-१, जिल्हा परिषद मुख्यालय, रायगड-अलिबाग-१, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड-अलिबाग-१, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड अलिबाग-१, उपविभागीय अधिकारी कार्यालय (सर्व)-८, तहसीलदार कार्यालय (सर्व)-१५, गटविकास अधिकारी कार्यालये (सर्व)-१५, नगरपालिका/नगरपंचायत कार्यालये (सर्व)-१५, उपजिल्हा रुग्णालये/ग्रामीण रुग्णालये (सर्व)-१६, प्राथमिक आरोग्य केंद्र (सर्व)-५२, पोलीस स्टेशन्स (सर्व)-३६, बसस्थानके-१५, ग्रामपंचायत कार्यालये (सर्व)-८०४, एकूण वीजप्रतिरोधक संख्या-९८०
सरकारने दीपस्तंभाची डागडुजी करावी
ब्रिटिशांच्या कालावधीत अलिबाग-तालुक्यातील रेवस आणि मांडवा या ठिकाणी सुमारे १०० फूट उंचीचे दीपस्तंभ उभारण्यात आले होते. पूर्वी समुद्रामार्गे धरमतरची खाडी ते अगदी श्रीवर्धन ते गोवा, कर्नाटकपर्यंत व्यापार चालायचा. त्यांना हे दीपस्तंभ दिशादर्शक ठरायचे. त्याचप्रमाणे, मुघल कालखंडात रात्रीच्या वेळी भर समुद्रातून ऐखादे जहाज कोकण प्रांतात येत असेल, तर टेहळणी बुरुज म्हणूनही या दीपस्तंभाचा उपयोग केला जात होता. या दोन्ही दीपस्तंभांवर वीजरोधक प्रणाली बसविली होती. त्यामुळे अलिबाग तालुक्यांमध्ये वीज पडत नव्हती, असे अॅड.रत्नाकर पाटील यांनी सांगितले. साध्या तांब्याच्या साहित्याची सुमारे ५० वर्षांपूर्वी चोरी झाली आहे. सरकारने या दीपस्तंभाची डागडुजी करून वीज प्रतिरोधक यंत्रणा नव्याने कार्यान्वित करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.
वीज प्रतिरोधक बसविण्याबाबतचा प्रकल्प प्राथमिक अवस्थेत आहे. केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रत्यक्षात प्रकल्प सुरू झाल्यावर वीज पडण्याच्या घटना रोखता येतील.
- अभय यावलकर, संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग