बिरवाडीतील बंद पोलीस चौकी बनली मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:14 PM2018-08-20T23:14:43+5:302018-08-20T23:15:00+5:30

भटक्या कुत्र्यांचे आश्रयस्थान; महाडमधील सुरक्षा ऐरणीवर

The liquor barricade built in Bandwadi police station | बिरवाडीतील बंद पोलीस चौकी बनली मद्यपींचा अड्डा

बिरवाडीतील बंद पोलीस चौकी बनली मद्यपींचा अड्डा

Next

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडीमधील बंद पोलीस चौकी मद्यपींचा अड्डा बनली आहे. भटक्या कुत्र्यांचेही हे हक्काचे आश्रयस्थान बनले आहे. पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बिरवाडीमधील नागरिकांच्या मागणीनुसार, लोकसहभागातून २०१२ मध्ये पोलीस चौकी उभारण्यात आली. काही दिवस ही पोलीस चौकी सुरळीत चालल्यानंतर कर्मचाऱ्यांअभावी ही पोलीस चौकी बंद झाली. या पोलीस चौकीच्या वरांड्यामध्ये भटक्या कुत्र्यांनी बस्तान बसविले आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये बिरवाडीमधील सुतार कुटुंबीयांच्या निवासस्थानी जबरी दरोडा पडल्यानंतर या ठिकाणी जमावाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखत या घटनेचा निषेध नोंदवला व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता लोकसहभागातून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत बिरवाडी पोलीस चौकी उभारण्यात आली. २३ जुलै २०१२ ला तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांच्याहस्ते या पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी पोलीस चौकी कार्यरत झाल्याने रोडरोमिओ व गुन्हेगारीला प्रतिबंध होऊन अवैध धंदे बंद होण्यास मदत झाली. मात्र प्रभारी अधिकारी आबासाहेब पाटील यांच्या कार्यकाळामध्ये पोलीस कर्मचाºयांच्या अभावी ही पो. चौकी बंद करण्यात आली. सध्या चौकीच्या वरांड्यामध्ये मद्यपींचा, तसेच भटक्या कुत्र्यांचा वावर आढळतो.
बिरवाडी पोलीस चौकी कर्मचाºयांच्या अभावी बंद असल्याबाबत नागरिकांनी रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या महाड भेटीप्रसंगी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पोलीस चौकी सुरू करण्याचे आदेश अधीक्षकांनी दिले. या आदेशाची अंमलबजावणी प्रभारी अधिकारी यांच्याकडून होणे अपेक्षित असतानाच पोलीस चौकीच्या आवारात मद्यपी व कुत्रे आश्रय घेत असल्याने पोलीस कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

लोकसहभागातून उभारण्यात आलेली बिरवाडी पोलीस चौकी बंद असली तरी दुसरीकडे मात्र महाड एमआयडीसी पोलीस ठाणे डिजिटल करण्यासाठी देणगीदारांमार्फत रंगरंगोटी व अन्य बाबींची पूर्तता करून घेतली जात आहे. मात्र लोकसहभागातून उभारलेली बिरवाडी पोलीस चौकी बंद असल्याने बिरवाडीमधील कायदा व सुव्यवस्था रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The liquor barricade built in Bandwadi police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.