पनवेलमधील दरडग्रस्त गावांची यादी जाहीर, सतर्कतेचाही दिला इशारा
By वैभव गायकर | Published: May 27, 2024 03:03 PM2024-05-27T15:03:30+5:302024-05-27T15:05:11+5:30
त्यात चिंचवाडी,धोदानी,सतीची वाडी,मालडुंगे या आदिवासी वाडीचा देखील समावेश आहे.
पनवेल:पनवेल तालुक्याचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला असून 14 गावे दरडीच्या दहशतीखाली असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यात चिंचवाडी,धोदानी,सतीची वाडी,मालडुंगे या आदिवासी वाडीचा देखील समावेश आहे.
डोंगराळ भागात अतिवृष्टीमुळे भूस्खलनामुळे आपत्कालीन परिस्थिति निर्माण होऊ शकते.यामुळे या गावांना सतर्कतेचा ईशारा तहसीलदार विजय पाटील यांनी दिला आहे. तालुक्यात आपत्कालीन पथक देखील स्थापन करण्यात आले आहे. पावसात अनेकदा या वाड्यांचा संपर्क तुटतो. त्याचबरोबर दरड कोसळण्याची भीती निर्माण होते. धोदानी येथील आदिवासी वाडीचा संपर्क दरवर्षी तुटत असतो. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तालुक्यातील गावांना दरडीचा धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. यात ओवळे, कर्नाळा, तळोजा व पनवेल ग्रामीणमध्ये डोंगराच्या पायथ्याशी काही गावे व आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त काही गावांना देखील धोका असून यामध्ये माडवभुवन, डोलघर, आकुर्ली, केवाळे, नानोशी, जांभिवली, माचीप्रबळ, कुंडेवहाळ, तुळशीमाळ चावणे आदी गावांचा समावेश आहे.
तालुक्यातील दरडग्रस्त गावे व आदिवासी वाड्यांची यादी जाहीर केली आहे.त्याठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.आमचे आपत्कालीन पथक देखील सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे.
विजय पाटील
(तहसीलदार पनवेल )