वादळातील नुकसानग्रस्त शाळांसाठी अल्प निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:43 AM2020-12-19T00:43:18+5:302020-12-19T00:43:47+5:30
म्हसळ्यातील शाळांची अवस्था अत्यंत बिकट
म्हसळा : चक्रीवादळाने म्हसळा तालुक्याची अवस्था अत्यंत बिकट असून सर्वच शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. फार मोठ्या प्रमाणात शाळांची पडझड झाली असून जिल्हा परिषदेकडून फक्त दुरुस्तीच्या मंजुरीच्या याद्याच प्रसिद्ध झाल्याचे चर्चेत आहे.
अगदी प्रत्येक गावात असणाऱ्या शाळांचे छत तर काही शाळांच्या इमारतीच्या भिंती पडल्या होत्या. या चक्रीवादळामध्ये तालुक्यात प्राथमिक शाळांसाठी अंदाजे एक ते दीड कोटीचा निधी तात्पुरत्या दुरुस्तीसाठी अत्यावश्यक असून, अजून निधीचा काही ठिकाणा नसल्याचे बोलले जाते. सध्याच्या परिस्थितीत तालुक्याचे ४० शाळांसाठी २ लाख रुपयांप्रमाणे ८० लाख मंजूर झालेले असले तरीदेखील ते नुकसान झालेल्या परिस्थितीला न पुरणारा निधी असून जखमेवरती मलम लावल्यासारखे आहे. तसेच १९ शाळांसाठी सर्व शिक्षण अभियाना अंतर्गत प्रास्ताविक निधी मंजूर केला आहे. परंतु ज्या १९ शाळा सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत प्रस्तावित आहेत त्याही शाळा चक्रीवादळामध्ये उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांनादेखील शासनाने २ लाख घोषित केलेला निधी अपेक्षित आहे. असे असताना तालुक्यासाठी निधी कमी करून का दिला, हा प्रश्न निरुत्तरच आहे.
शासनाने पारित केल्याप्रमाणे चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या शाळेचा निधी त्यांना उपलब्ध करून द्यावा तरच मोडकळीस झालेल्या शाळा नव्याने उभ्या राहतील. तालुक्यात एकूण १०२ शाळा मोडकळीस आल्या आहेत. त्यापैकी आताच्या यादीनुसार एकूण ५९ शाळांना निधी मंजूर झाला. परंतु उर्वरित राहिलेल्या ४३ शाळांचा निधी कधी मिळणार, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला आहे. काही दिवसांतच शाळा सुरू होण्याचे चिन्ह आहे. परंतु शाळाच जर जमीनदोस्त असतील तर विद्यार्थी बसणार कोठेॽ त्याकरिता शाळा दुरुस्तीसाठी लागणारा अंदाजे ३ कोटींचा निधी मिळणे गरजेचे आहे. शाळा पूर्ववत आणि सुस्थितीत व्हाव्यात अशी मागणी होत आहे.