जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वाचले विद्यार्थ्यांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:50 PM2019-08-08T23:50:10+5:302019-08-08T23:50:16+5:30
जमिनीला तडे गेल्याने घरांचे नुकसान; महाडमधील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जमीनदोस्त
बिरवाडी : रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशामुळे रायगड जिल्हा परिषदेमधील विद्यार्थ्यांचे प्राण वाचल्याची
घटना समोर आली आहे. महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत बुधवार ७ आॅगस्ट रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे जमीनदोस्त झाली.
महाड तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्याने शाळा बंद ठेवण्याचा आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्याने या शाळेत शिकत असणाºया इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. महाड तालुक्यातील कसबेशिवथर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली. याप्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता रा.जि.प. सदस्य मनोज काळिजकर यांच्याजवळ संपर्क साधला असता अतिवृष्टीच्या काळामध्ये शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यानेच विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत असे सांगितले तर या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गेल्या वर्षी रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे सादर केला असल्याचे स्पष्ट केले आहे.
एमआयडीसीतील कं पन्यांचे नुकसान
एमआयडीसीमधील कारखान्यांमधून महापुराचे पाणी शिरल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामध्ये महाड एमआयडीसीमधील हितकरी हायटेक प्रायव्हेट लिमिटेड, लक्ष्मी आॅरगॅनिक, हायकल लिमिटेड, मलक स्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यांचा समावेश आहे. महसूल विभागाचे तलाठी यांच्यामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
माझेरी गावातील दोन घरांचे नुकसान
महाड तालुक्यात सतत पडणाºया मुसळधार पावसामुळे मंगळवारी माझेरी गावामध्ये जमिनीला भेगा पडल्याने या ठिकाणी घराच्या बांधकामाला तडे गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये शांताराम कोळसकर, दीपक महामुनी यांच्या घराचे नुकसान झाले आहे. या परिसरातील अनेक रस्त्यांचे नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे .