श्रीवर्धनमध्ये पशुसंवर्धन सेवेचा उडाला बोजवारा; उपलब्ध अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 02:43 AM2019-12-03T02:43:47+5:302019-12-03T02:43:55+5:30
श्रीवर्धन, बागमांडला, दांड्गुरी, बोर्लीपंचतन, दिघी, सायगाव या ठिकाणी श्रेणीनुसार पशुसंवर्धन सेवा पुरवली जाते.
- गणेश प्रभाळे
दिघी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शेतीला प्रमुख पूरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाºया व असंख्य नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारा पशुपालन व्यवसाय सध्या धोक्यात आला आहे. श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या संख्येने जनावरे असतानादेखील त्यांच्यावर उपचाराची मात्र प्रभावी यंत्रणा नाही. या ठिकाणी असलेले लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात दोन वर्षांपासून महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा थेट परिणाम जनावरांच्या उपचारावर होत असून, वारंवार मागणी आणि गरज असताना ग्रामीण भागातील पशुसंवर्धन सेवेकडे दुर्लक्ष होत आहे.
श्रीवर्धन, बागमांडला, दांड्गुरी, बोर्लीपंचतन, दिघी, सायगाव या ठिकाणी श्रेणीनुसार पशुसंवर्धन सेवा पुरवली जाते. काही ठिकाणी पशुवैद्यकीय चिकित्सालयाची विशाल इमारत शासनाने लाखो रुपये खर्चून बांधली आहे, परंतु सध्या ती निरुपयोगी ठरत आहे. त्यामुळे शेतकरी वगार्तून तीव्र संताप व्यक्त होत असून, पर्यवेक्षक, अधिकाºयांविना पशुचिकित्सालय असून अडचण, नसून खोळंबा अशीच झाली आहे.
ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये पशुधन पर्यवेक्षकाकडून जनावरांवर उपचार केले जातात. परंतु शस्त्रक्रियांसारख्या बाबींसाठी शेतकरी आपली जनावरे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पशू चिकित्सालयात आणतात. या चिकित्सालयाशिवाय शेतकºयांपुढे दुसरा पर्याय नाही, परंतु या ठिकाणी अपेक्षित असा उपचार पशुंना मिळत नाही.
विविध रिक्त पदे, औषधींचा तुटवडा अशा बाबी या ठिकाणी नित्याच्याच झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींचा लक्ष नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ दिसून येतो. श्रीवर्धन तालुक्यातील तीन श्रेणी एकचे दवाखाने असताना एकाच पशुधन विकास अधिकाºयावर तीन इतर पदांचा अतिरिक्त भर आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी अधिकाºयांना पोचता येत नाही.
तालुक्यात नऊ पदे रिक्त
श्रीवर्धन तालुक्यात नऊ पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे विविध रोगाच्या लसीकरणावरही परिणाम होत आहे. तालुक्यात पशुधन सेवा देण्यासाठी, तसेच लाळ खुरकत, कृत्रिम रेतन, विविध आजार हटविण्यासाठी लसीकरण मोहीम पशू चिकित्सालयातून राबविली जाते. तर काही ठिकाणी उपकेंद्र असून कर्मचारी नाही. सध्या कार्यरत अधिकारी व कर्मचारी सेवेसाठी कमी पडत आहेत. परिणामी, तालुक्यातील पशुसंवर्धन सेवा प्रचंड अस्थिपंजर झाल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध असलेले लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात मोठी कसरत करावी लागत असल्याची प्रतिक्रिया येथील अधिकारी व कर्मचाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अतिरिक्त कार्यभार
श्रीवर्धन तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी एम. जि. शिसोंदे यांच्याकडे श्रीवर्धन, बागमांडला व पंचायत समिती विस्तार या अधिकाºयांचा अतिरिक्त कार्यभार आहे.
रिक्त पदे
पशुधन विकास अधिकारी २
विकास अधिकार (विस्तार) १
पशु पर्यवेक्षक १
व्रणोप्रचारक २
शिपाई ३
रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू असून मागणी करत आहोत. पुढे लवकरच होणाºया नव्याने भरतीनुसार रिक्त पदे भरली जातील अशी माहिती वरिष्ठांकडून माहिती मिळत आहे.
- उज्ज्वला आठवले, पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समिती, श्रीवर्धन