राबगाव /पाली : सुधागड तालुक्यात पाली, चव्हाणवाडी आणि जांभूळपाडा या ठिकाणी श्रेणी एकचा गुरांचा दवाखाना तर वाघोशी, खवली आणि नांदगावमध्ये श्रेणी दोनचा गुरांचा दवाखाना आहे; परंतु येथील गुरांच्या दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून पशुवैद्यकीय अधिकारी व अन्य पदे रिक्त आहेत.पाली या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गुरांच्या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक ही तीनही पदे रिक्त असून, फक्त शिपाई पदावर एक कर्मचारी हजर आहे. तर तालुक्यातील सर्वच दवाखान्यात आठ जागांपैकी फक्त दोनच जागांवर कर्मचारी आहेत. यामुळे सुधागड तालुक्यातील जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तापमानाचा पारा वाढत असल्याने गुरेही आजारी पडत आहे, अशा वेळी त्यांना उपचारासाठी न्यायचे कुठे, असा प्रश्न सध्या गुरांच्या मालकाला पडला आहे.पाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाली येथील श्रेणी एकच्या गुरांच्या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व विस्तार अधिकारी या दोन्ही पदांचा भार अतिरिक्त कार्यभार नागोठणे येथील पशुवैद्यकीय अधिकारी सोमनाथ भोजने यांना देण्यात आला आहे. मंगळवार आणि शुक्रवारी ते या दवाखान्यात हजर असतात, तर वाघोशी येथील पशुधन पर्यवेक्षकांना अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.चव्हाणवाडी येथील श्रेणी एकच्या दवाखान्यात पेण येथील पशुवैद्यकीय अधिकारी तर जांभूळपाडा येथे खालापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याने मनुष्यबळाअभावी त्यांच्यावरील ताण वाढला आहे.चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा फटका बसत असून वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांसाठी पशुधन विभागाकडून लसीकरण व पशुपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.जनावरांनाही ऋतुमानानुसार काही आजार जडतात, तसेच हवामान बदलाचा त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम होतो. त्यात वेळीच उपचार न मिळाल्यास जनावरे दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होते. येथे असलेल्या दवाखान्यांत सध्या पशुवैद्यकीय अधिकारी नाहीत, शिवाय लसी, इंजेक्शन उपलब्ध नाहीत. त्यामुळे दुभती जनावरे डोळ्यांसमोर मरताना पाहवी लागतात. शासनाने लक्ष दिल्यास पशुधन वाचेल आणि शेतकºयांचे नुकसान टळेल.- शरद गोळे, शेतकरी, शिळोशीसध्या जिल्ह्यातील वाढत्या पाºयामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून माणसे विविध मार्गांनी आपला बचाव करू शकतात; मात्र जनावरांना कडक उन्हाचा फटका बसत आहे. गायवर्गीय गुरे आणि प्रजननक्षम असलेल्या गुरांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील जनावरांची भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे.उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. जनावरे उष्माघाताचे बळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरीराचे तापमान १०३ ते १०७ अंश पर्यंत वाढते. यामुळे श्वसनाचा वेग व हृदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, तोल जाऊन जनावरे कोसळणे, झटके येणे आदीची भीती वाढली आहे.
पालीमध्ये पशुधन अधिकाऱ्यांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 2:44 AM