राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : उन्हाळी सुट्टी घालविण्यासाठी अलिबागेत आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात हाल झाले आहे. मांडवा ते गेटवे जलवाहतूक २६ मे पासून बंद झाल्याने अलीबागेत आलेल्या पर्यटकांना परतीच्या प्रवासात एस टी बस चा आसरा घ्यावा लागला आहे. अलिबाग आगारात प्रवाशाची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. वाढलेल्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी एस टी प्रशासनाला बसेसची उपलब्ध करताना नाकी नऊ आले आहेत.
गुरुवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक हे जलवाहतूकीने अलिबगेत दाखल झाले होते. पावसाळ्यामुळे २६ मे पासून मांडवा ते गेटवे ही जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अलिबाग मध्ये आलेल्या पर्यटकांना शनिवारी परतीच्या मार्गावर निघताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. जलवाहतूक बंद झाल्याने एस टी बस वर प्रवाशांचा लोड वाढला आहे.
शनिवारी दुपारपासून पर्यटक हे परतीच्या मार्गाला लागले आहे. जलवाहतूक बंद झाल्याने पर्यटक हे अलिबाग आगारात दाखल झाले आहेत. याठिकाणी पर्यटक प्रवाशाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. अचानक वाढलेल्या प्रवासी संख्या मुळे प्रशासनाची मात्र दमछाक झाली आहे. यासाठी जादा बसेस प्रशासनातर्फे उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र तरीही जादा बसेस ही कमी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.