नवी मुंबई : मागील तीन महिन्यांपासून ठप्प असलेली एनएमएमटीची प्रवासी सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. परंतु सोशल डिस्टन्सिंगमुळे प्रवासी संख्या घटणार असल्याने संभाव्य तोटा टाळण्यासाठी एका प्रवाशाकडून दोन तिकिटे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.परंतु प्रत्यक्षात तो अमलात येण्यापूर्वीच त्यास विरोध होऊ लागला आहे.
लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून एनएमएमटीची प्रवासी वाहतूक ठप्प होती. केवळ अत्यावश्यक सुविधांमधील प्रवाशांसाठीच काही बस चालवल्या जात होत्या. अखेर अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात प्रवाशांना वाहतुकीची सुविधा देण्यासाठी एनएमएमटीच्या बस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. त्यानुसार सध्या २२ मार्गांवर एनएमएमटीच्या २१५ बस धावत आहेत. दिवसाला त्यांच्या ८५८ फेऱ्या होत आहेत. परंतु सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी प्रत्येक बसमध्ये आसन व्यवस्थेच्या निम्मे प्रवासी घेतले जात आहेत. यामुळे एनएमएमटीला बस सुविधा सुरू करूनही रोजचा खर्च काढणे अवघड झाले आहे.परिणामी एका सीटवर एक प्रवासी बसत असल्याने त्याच्याकडून दोन प्रवाशांचे तिकीट आकारण्याचा निर्णय परिवहन उपक्रमाने घेतला आहे. दोन दिवसांत त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.मागील अनेक वर्षांपासून एनएमएमटी प्रति महिना सुमारे साडेसहा कोटी रुपये तोट्यात चालवली जात आहे. अशातच तीन महिने लॉकडाऊन लागल्याने या कालावधीत परिवहनला प्रति महिना सुमारे ९ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर पुन्हा रस्त्यावर बस धावत असताना त्यावर होणारा खर्च तरी निघाला पाहिजे, अशी प्रशासनाची भूमिका आहे. परंतु या निर्णयाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला बसू शकतो. त्यामुळे परिवहनच्या या निर्णयाला सर्वच स्तरांतून विरोध होत आहे. तर हाच विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी परिवहन व्यवस्थापकांच्या दालनात आंदोलन केले. शहरवासीयांकडून होणाºया या विरोधाची प्रशासनाला दखल घ्यावी लागणार आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत बस बंद असल्याने उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. लॉकडाऊननंतर २१५ बस रस्त्यावर उतरवल्यानंतर किमान त्यावर होणारा खर्च तिकीट विक्रीतून निघणे अपेक्षित आहे. त्यानुसार एका प्रवाशाकडून दोन प्रवाशांचे भाडे घेण्याचे विचाराधीन आहे.- शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक