पर्यटनातून मिळणार स्थानिकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 04:36 AM2018-04-22T04:36:12+5:302018-04-22T04:36:12+5:30

पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील पाच किल्ल्यांचा समावेश या योजनेत करण्यात येणार आहे. यामध्ये सागरगड (अलिबाग), सरसगड (पाली), पेब, कोथळीगड व खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे.

Local employment to tourists | पर्यटनातून मिळणार स्थानिकांना रोजगार

पर्यटनातून मिळणार स्थानिकांना रोजगार

Next

जयंत धुळप ।

अलिबाग : गडभ्रमण आणि निसर्गभ्रमण इच्छूक तरुणाई आणि इतिहासप्रेमी यांना सुरक्षित गडभ्रमण आणि निसर्गभ्रमण करता यावे, याकरिता रायगडचे निसर्ग व इतिहासप्रेमी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका विशेष योजनेची निर्मिती केली आहे. गडभ्रमण आणि निसर्गभ्रमण यातून पर्यटनवृद्धी आणि पर्यटनातून स्थानिक ग्रामस्तरावर स्थानिकांना रोजगार संधी, असे या योजनेचे स्वरूप राहणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या कार्यालयात या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची रूपरेषा तयार करण्याच्या अनुषंगाने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस गडभ्रमण आणि निसर्गभ्रमणात कार्यरत डॉ. चंद्रशेखर साठे, पक्षी तज्ज्ञ डॉ. वैभव देशमुख, युथ हॉस्टेल सदस्य अनिल जोशी, सरिता गायकवाड व युथ हॉस्टेल पर्यावरण आणि गड सवर्धन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात एकूण ३९ ऐतिहासिक किल्ले आहेत. या किल्ल्यावर जाण्यासाठी इतिहासप्रेमी आणि विशेषत: तरुणाई मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत असते. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात गिरिभ्रमणादरम्यान सुमारे २० मृत्यू झाले आहेत, तर सुयोग्य वाटाड्याअभावी जंगलात चुकण्याचे प्रसंग घडले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षित गडभ्रमण आणि निसर्गभ्रमण ही संकल्पना युथ हॉस्टेल असोसिएशन आॅफ इंडिया या गिरिभ्रमण उपक्रम आयोजनात व्यस्त संस्था व अशाच हेतूने स्थानिक पातळीवर कार्यरत संस्था, किल्ल्याच्या जवळील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयीन विद्यार्थी, गडकिल्ल्याच्या परिसरातील स्थानिक ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि स्थानिक युवक, जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा, वन विभाग व स्थानिक महसूल कर्मचारी यांच्या संयुक्त सहयोगातून ही योजना अमलात आणण्याचे नियोजन या बैठकीतील चर्चेतून करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील पाच किल्ल्यांचा समावेश

पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील पाच किल्ल्यांचा समावेश या योजनेत करण्यात येणार आहे. यामध्ये सागरगड (अलिबाग), सरसगड (पाली), पेब, कोथळीगड व खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील गडभ्रमण उपक्रम व्यस्त संस्थांचा समन्वय साधून उर्वरित किल्ल्यावर ही योजना टप्प्याटप्प्याने अमलात आणण्यात येणार आहे.

गिरिभ्रमणास येणाऱ्यांची नोंदणी, वाटाड्याची सुविधा, गडावर आवश्यक माहिती फलक, निवारा व न्याहरी व्यवस्था, पक्षी व इतिहासविषयक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सत्वर साहाय्य आदीचा समावेश या सुरक्षित गिरिभ्रमण व निसर्गभ्रमण योजनेत करण्यात येणार आहे. दरम्यान, अलिबाग जवळच्या सागरगड किल्ल्यावरील सुरक्षित गिरिभ्रमण व निसर्गभ्रमण योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकरिता करावयाच्या नियोजनाकरिता लवकरच ग्रामस्थ व स्थानिकांबरोबर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Local employment to tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fortगड