अलिबाग-वडखळ मार्गामुळे स्थानिक रोजगार होणार नष्ट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 06:15 AM2017-09-14T06:15:08+5:302017-09-14T06:15:20+5:30

अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गामुळे अलिबाग तालुक्यातील असंख्य रोजगार नष्ट होणार आहेत तर, हजारो घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यावर उपाय म्हणून वेश्वी ते चेंढरे बायपास रस्त्यापर्यंत उड्डाणपूल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ढवळे यांनी केली. महामार्गाला अजिबात विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Local employment will be affected due to Alibaug-Wadkhal road | अलिबाग-वडखळ मार्गामुळे स्थानिक रोजगार होणार नष्ट  

अलिबाग-वडखळ मार्गामुळे स्थानिक रोजगार होणार नष्ट  

googlenewsNext

अलिबाग : अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गामुळे अलिबाग तालुक्यातील असंख्य रोजगार नष्ट होणार आहेत तर, हजारो घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यावर उपाय म्हणून वेश्वी ते चेंढरे बायपास रस्त्यापर्यंत उड्डाणपूल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ढवळे यांनी केली. महामार्गाला अजिबात विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिका-यांना देऊन सरकारपर्यंत भावना पोचविण्याची विनंती केली.
अलिबाग शहरासह तालुक्यामध्ये विकास होत आहे. त्यामुळे येथे नागरीकरणही मोठ्या संख्येने वाढले आहे. अलिबाग हे टुरिस्ट डेस्टीनेशन असल्याने वीकेन्डसह सुटीच्या हंगामामध्ये येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अलिबाग-वडखळ या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण येत होता. यासाठी केंद्र सरकारने अलिबाग-वडखळ मार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात केले. आता या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. तब्बल एक हजार ७०० कोटी रुपये या महामार्गासाठी खर्च केले जाणार आहेत.
अलिबाग-वडखळ महामार्गाच्या लगतची जमीन संपादित केली जाणार आहे. विकासकामांना आमचा अजिबात विरोध नाही. परंतु विकास होताना सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून विकास केल्यास विकासाची खरी संकल्पना साकार होईल, असेही निवेदनात नमूद केले आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी हे महत्त्वाच्या बैठकीमध्ये व्यस्त असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ, उपाध्यक्ष संतोष निगडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश घरत आदी उपस्थित होते.

स्थानिकांवर उपासमारीची वेळ
राष्ट्रीय महामार्ग १६६ ए हा अलिबाग-वडखळला जोडला जाणार आहे. हा महामार्ग झाल्यास निश्चितच विकासाची नवनवीन दारे खुली होतील. परंतु या महामार्गामुळे बाधित होणाºयावर फार मोठे संकट कोसळणार आहे. या माहामार्गालगत अलिबाग तालुक्यातील चेंढरे, वेश्वी, वाडगाव, खंडाळे यासह अन्य मोठ्या ग्रामपंचायती आहेत. येथे दोन्ही बाजूंना मोठ्या संख्येने लोकवस्ती, तसेच विविध छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. त्यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. ते नष्ट झाल्यास स्थानिकांवर रोजगार बुडून उपासमारीची वेळ येणार आहे.
उड्डाणपूल झाल्यास काही अंशी प्रश्न सुटणार
महामार्ग झाल्यामुळे या ग्रामपंचायती तसेच गावांना सर्व्हिस रोड दिला, तरी महामार्ग असल्याने वाहने सुसाट वेगाने जातील. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग असल्याने तेथे गतिरोधक ही टाकता येणार नाहीत. यावर उपाय म्हणून वेश्वी-चेंढरे बायपास रोड या भागामध्ये उड्डाणपूल झाल्यास काही अंशी प्रश्न सुटणार आहेत. या महामार्गावरील गोंधळपाडा, वेश्वी, स्वामी समर्थ नगर, आरसीएफ कॉलनी, सुजलाम नगर, गुरव नगर, कृष्ण दर्शन, पिंपळ भाट येथे उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोड दिल्यास हा मार्ग सोयीस्कर होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: Local employment will be affected due to Alibaug-Wadkhal road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.