- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड, मुंबईतील सुमारे १६० बोटींनी मागील आठवड्यात आलेल्या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरामध्ये या बोटींनी आश्रय घेतला होता; परंतु या बोटीतील पकडलेले तीन हजार किलोचे मासे बंदरावर उतरवण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने मच्छीमारांवर मासे फेकून देण्याची वेळ आली. यामुळे मच्छीमारांचे सुमारे तीन कोटी रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आश्रय मिळाला. मात्र, पकडलेली मासळी फेकून द्यावी लागल्याने मच्छीमारांना अश्रू अनावर झाले होते. या विरोधात सरकार आणि प्रशासनाकडे दाद मागण्यात येणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.१ आॅगस्ट रोजी मासेमारी करण्याची अधिकृत बंदी आदेश उठल्यानंतर रायगड, मुंबईमधील सुमारे १६० बोटी या मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेल्या होत्या. मात्र, हवामान खराब झाल्याने अचानक वादळ सुरू झाले. त्यामुळे या बोटींना आश्रय घेणे क्रमप्राप्त होते. प्रत्येक बोटीमध्ये सुमारे २५० किलोचे मासे होते. बोटी ज्या ठिकाणी होत्या. तेथून रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदर जवळ होते. त्यामुळे स्वाभाविकपणे या बोटींना तेथे आश्रय मागितला. त्यानंतर १ ते ३ आॅगस्टपर्यंत हवामान खराब असल्याने तसेच १४ आॅगस्टपर्यंत हवामानात फरक पडणार नसल्याने पकडलेली मासळी खराब होणार होती. बंदरावर मासळी उतरवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती बोटींतील सर्वांनी स्थानिकांना केली. मात्र, स्थानिकांनी त्याला नकार दिला. त्यानंतर रस्ते मार्गाने मुंबईकडे वाहतूक करण्यासाठी परवनागी देण्याबाबतही विनंती केली. त्यालाही नकार मिळाला.जिल्हा प्रशासनाने याबाबत बैठकही लावली. मात्र, स्थानिकांच्या हट्टापाई त्यांनीही सहकार्य केले नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची आमची मासळी खराब होऊन नुकसान झाल्याचे बोटीचे मालक अंबर नाखवा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरम्यान, रायगड जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंग शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलानाही.१६० बोटींमध्ये प्रत्येकी २५० किलो मासळीआर्थिक नुकसान झालेल्या बोटी या प्रामुख्याने रेवस, करंजा, बोडणी परिसरातील आहेत, तसेच काही बोटींचे पंजीकरण हे मुंबईतील ससूण डॉकमधील आहे. १६० बोटींमध्ये प्रत्येकी २५० किलो मासळी होती. त्यामध्ये पापलेट या मासळीचे प्रमाण अधिक होते. प्रत्येक बोटीचे सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने एकत्रितपणे विचार केल्यास हा आकडा सुमारे तीन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते.स्थानिकांच्या विरोधामुळे नुकसानस्थानिक बाजारपेठेत मासळी विकू न दिल्याने हीच मासळी रस्ते मार्गाने मुंबईत विक्री करण्यासाठी तीन ट्रक चिपळूणला पोहोचले होते; परंतु स्थानिकांनी बोटीतील मासळी उतरवण्याला विरोध केला. त्यामुळे सर्व वाहनांना रिकाम्या हातानेच माघारी फिरावे लागले होते. स्थानिकांच्या विरोधापुढे काही एक न चालल्याने आता हळूहळू काही बोटी या स्वगृही परतल्या आहेत. स्थानिकांनी मासळी उतरवण्याची परवानगी दिली असती, तर आज कोट्यवधी रुपयांच्या मासळीचे नुकसान झाले नसते.भरपाईसाठी मागणार जिल्हाधिकाऱ्यांकडे दादआपत्तीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरामध्ये आश्रय घेण्याला स्थानिकांनी अनुमती दिली; परंतु मासळी उतरवण्यास परवानगी दिली असती तर कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले नसते. भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांवर अशी वेळ आली आणि रायगड अथवा मुंबईमधील स्थानिकांनी त्याला विरोध केल्यास त्यांचेही नुकसान होईल; परंतु रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी नेहमीच सलोख्याची भूमिका घेत कोणाचेही नुकसान केले नसल्याकडे अंबर नाखवा यांनी लक्ष वेधले. नुकसानभरपाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जयगड बंदरात मासळी उतरवण्यास स्थानिकांच्या विरोधामुळे मच्छीमारांना फटका, तीन कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 2:17 AM