मोहोपाडा : येथील ‘तलाव मद्यपींचा अड्डा’ या मथळ्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच येथील दुरवस्था पाहून, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सरकारी यंत्रणांवर विसंबून न राहता डिंपल सोमण यांनी पुढाकार घेतला आहे. तलावाच्या स्वच्छतेसाठी त्या योगा क्लासचा निधी वापरत असल्याचे मनीष सोमण यांनी सांगितले.वासांबे देवीच्या मंदिरासमोरील तलावाच्या पाय-यांवर सायंकाळ होताच मद्यपींचा अड्डा बनतो. मद्यप्राशनानंतर नशेच्या धुंदीत रिकाम्या बाटल्या तलावात टाकणे, तसेच आसपासच्या परिसरात उघड्यावर कचरा टाकून परिसराला बकाल रूप आणले होते. सिगारेट, गुटख्याच्या पुड्या तलावाच्या परिसरात टाकून परिसर अस्वच्छ केला होता. या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले. याची दखल घेऊनसामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने मोहोपाडा येथील नागरिकांनी तलावाच्या बाहेरील परिसराची स्वच्छता केली. यासाठी मनीष सोमण व डिंपल सोमण यांनी विशेष प्रयत्न केले, तर अर्चना काशिकर, राहुल काशिकर, संतोष सोमण, मंजिरी सोमण, मिलिंद ओक, मयुरी ओक, संदीप आपटे, अनिल शहासणे, संजय गुप्ता आणि गुप्ता कंपनी यांनी मेहनत घेतली. मोहोपाडा तलावाची संपूर्ण स्वच्छता करण्यासाठी दर रविवारी सकाळी ८ ते ११ यावेळेत पर्यावरणप्रेमींनी हजर राहून सहकार्य करावे, असे आवाहन मनीष सोमण यांनी केले आहे.
मोहोपाडा येथील तलावाची स्थानिकांनी केली स्वच्छता, डिंपल सोमण यांनी घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 3:37 AM