नुकसान भरपाईसाठी चालढकल करणाऱ्या सिडको विरोधात रहिवाशांचे उपोषण, ठोस निर्णयाविना माघार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:52 PM2022-09-19T18:52:11+5:302022-09-19T18:53:06+5:30

नुकसान भरपाईसाठी चालढकल करणाऱ्या सिडको विरोधात रहिवाशांनी आंदोलन केले आहे. 

Local residents of Uran have protested against CIDCO | नुकसान भरपाईसाठी चालढकल करणाऱ्या सिडको विरोधात रहिवाशांचे उपोषण, ठोस निर्णयाविना माघार नाही

नुकसान भरपाईसाठी चालढकल करणाऱ्या सिडको विरोधात रहिवाशांचे उपोषण, ठोस निर्णयाविना माघार नाही

Next

मधुकर ठाकूर

उरण (रायगड) :  सिडकोने दिघोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील १८ नुकसानग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याच्या या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा राजिपचे माजी सदस्य डॉ. मनिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिघोडे येथील रहिवाशांनी उरण तहसील कार्यालयासमोरच सोमवारपासून (१९) उपोषण सुरू केले आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी दिड मिटर व्यासाची जलवाहिनी १७ डिसेंबर २०२० रोजी दिघोडे ग्रामपंचायत हद्दीत फुटली होती. 

सदर मोठ्या प्रमाणावर फुटलेल्या जलवाहिनीमुळे परिसरातील १८ रहिवाशांच्या राहत्या घरांचे व व्यावसायिकांच्या दुकानातील सामानाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. तसेच रस्त्यावरील काही वाहनेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. नुकसानग्रस्तांना आर्थिक भरपाई मिळावी यासाठी रहिवाशांनी सदर पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम रोखले होते. यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी १८ नुकसानग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण होताच दिलेल्या आश्वासनाकडे कानाडोळा करीत सिडको व्यवस्थापनाकडून आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. सातत्याने सुरू करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतरही आजतागायत सिडकोकडून रहिवाशांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. 

सिडको विरोधात रहिवाशांचे उपोषण
त्यामुळे सिडकोच्या बनवाबनवीमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. मनिष पाटील यांनी उरण तहसील कार्यालयासमोरच सोमवारपासून (१९) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, जिल्हा चिटणीस किरीट पाटील, माजी नगरसेवक महेंद्र कांबळे, भालचंद्र घरत, विनोद पाटील, महेंद्र ठाकूर, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, अल्पसंख्याक तालुकाअध्यक्ष शाकीर कादीर शेख, निर्मला पाटील, बी.एम.ठाकूर, माजी नगरसेविका अफशा मुकरी, गणेश पाटील, माजी सरपंच किर्तीनिधी ठाकूर, माजी उपसरपंच प्रेमनाथ ठाकूर यांच्यासह अनेकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे.

आंदोलनकर्ते उपोषणावर ठाम 
दरम्यान, सिडकोने नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई देण्याच्या सूचना उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिल्या आहेत. तर सिडकोच्या वरिष्ठ व्यवस्थापक अधिकाऱ्यांकडे नुकसानग्रस्तांच्या आर्थिक भरपाई देण्यासाठी अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच नुकसानग्रस्तांना आर्थिक भरपाई देण्यात येणार असल्याचे मोघम आश्वासन सिडको अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. मात्र त्यावर उपोषणकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यांच्यापदरातही काही पडलेले नसल्याने आंदोलन मागे अद्याप तरी मागे घेण्यात आले नसल्याची माहिती उपोषणकर्ते डॉ.मनिष पाटील यांनी दिली. 


 

Web Title: Local residents of Uran have protested against CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.