जंजिरा किल्ला बंद होणार असल्याने स्थानिक नाराज, लाखो रुपयांच्या उलाढालीला लागणार ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:17 AM2020-12-24T00:17:55+5:302020-12-24T00:18:16+5:30
Janjira fort : मुरुड समुद्रकिनारी व राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्याकरिता आल्याने येथील व्यावसायिकांना चांगला रोजगार मिळत असतो.
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रात असणारा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी नाताळाच्या दिवशी व नववर्षाचे स्वागत करण्याकरिता लाखो पर्यटक महाराष्ट्राच्या विविध भागांतून येत असतात.
मुरुड समुद्रकिनारी व राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्याकरिता आल्याने येथील व्यावसायिकांना चांगला रोजगार मिळत असतो. या रोजगारातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. परंतु कोरोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याने त्यात ऐतिहासिक जंजिरा किल्ला बंद होत असल्याने स्थानिक व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाताळ सण आणि नववर्ष स्वागताचा संभाव्य जल्लोष लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्थानिक परिस्थितीनुसार रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निथी चौधरी यांनी घेतला आहे. तसेच कोरोनासंबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर कारवाई करण्यात येणार असल्याने व्यावसायिक धास्तावले आहेत.