लोकमत न्यूज नेटवर्क मुरूड जंजीरा : रायगड जिल्ह्याला ३२० किलोमीटरचा सागरकिनारा लाभला आहे. जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील दिवेगार, हरिहरेश्वर, बागमांडला, मुरुड येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला, काशीद समुद्रकिनारा, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, किहीम बिच, ऐतिहासिक स्थळे अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना नेहमीच आवडतात. संचारबंदी व लॉकडाऊनमुळे या पर्यटनस्थळांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मुरुड तालुक्यात काशीद समुद्रकिनारा, मुरुड समुद्रकिनारा, ऐतिहासिक जंजिरा किल्ला पद्मदुर्ग किल्ला, फणसाड अभयारण्य, नवाबकालीन गारंबी धरण अशी महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे आहेत. मागील वर्षी केंद्राचा लॉकडाऊन तर आता राज्य शासनाचा लॉकडाऊन त्यामुळे पर्यटकांवर निर्भर असलेल्या तालुक्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. हॉटेल,लॉजिंग तर सुनेसुने झाले आहेत. घोडागाडी व्यवसाय करणारे, वॉटर स्पोर्ट सर्व जण घरात बसून असून १५ दिवसाचा लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहेत. एकेकाळी पर्यटकांची वर्दळ असणारा हा तालुका आता मात्र खूप उदास वाटत आहे. सर्वच घटकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठी गर्दी पहावयास मिळायची. सलग सुट्ट्यांमध्ये एका दिवसात २५ हजारपेक्षा जास्त पर्यटक यायचे. परंतु सध्या येथे कुणीच फिरकत नसल्याने असंख्य शिडाच्या बोटी, मशीनवाल्या बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत. जंजिरा किल्ल्यापासून सुमारे २५० लोकांना रोजगार मिळत होता आता हा व्यवसाय पूर्णतः बंद झाल्याने लोक फार चिंतेत दिसत आहेत. जंजिरा किल्ल्याच्या बाजूला असणारी टोपी, गॉगल्स, शहाळी विक्रेते, चहाची टपरी, सरबत स्टॉल आदी सर्वच दुकाने बंद झाल्याने या लोकांचासुद्धा मोठा रोजगार बुडाला आहे. सातत्याने दोन वर्षांत सर्वात मोठा लॉकडाऊन झाल्याने लोक मेटाकुटीस आले असून, लॉकडाऊन नकोच अशी मागणी करीत आहेत. परंतु शासनाच्या नियमामुळे लोकसुद्धा , हतबल झाले आहेत.
मुरुड तालुक्यातील बहुतांश लोकांनी बँक लोन घेऊन आपली हॉटेल्स अथवा लॉजिंग थाटली आहेत. अशावेळी सर्व लोकांना बँकेचे व्याज व हप्ता भरताना मोठी दमछाक होत आहे.या तालुक्यातील लोक संचारबंदी व लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक समस्येत असून, येणारा भावी काळच त्यांना या जोखडातून मुक्त करेल अशी अपेक्षा सर्व व्यापारी बाळगून आहेत. राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केल्यामुळे १ मार्चपासून येथे पर्यटक येणे बंद केले आहे.त्यामुळे सर्व शिडांच्या बोटी व मशीन बोटीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. - जावेद कारभारी, चेअरमन, वेलकम सोसायटी
पर्यटक बाहेर पडणे टाळत आहेत. आमच्याकडे १ मार्च २०२१ पासून विविध भागात संचारबंदी झाल्याने पर्यटक कमी झाले आहेत. आमच्याकडे १० रूम असून कुणीही पर्यटक फिरकत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून रिकाम्या असून कोणताही व्यवसाय होत नाही. लॉकडाऊनमुळे धंद्याला खीळ बसली असून, बँकेचे हप्ते व व्याज याचे गणित बांधणे खूप कठीण झाले आहे. -मनोहर बैले, हॉटेल मालक
समुद्रकिनारी ५४ टपऱ्या आहेत. या टपऱ्यांमधून चहा, अल्पोपाहार, भोजन बनवून देणे अशा सुविधा पर्यटकांना दिल्या जातात. संचारबंदी व लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी येथे येणे बंद केल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. ३ जूनच्या चक्रीवादळात सर्व टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. कर्ज काढून लोकांनी आपल्या गाड्या बनून घेतल्या होत्या; परंतु अचानक पर्यटक थांबल्याने टपरीधारकांच्या कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे. अरविंद गायकर, अध्यक्ष, पद्मदुर्ग कल्याणकारी संघटना