अलिबाग - कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यातील नागरिकांना दोन वषे विविध टप्यात जवळपास दोन वर्षे नागरिकांना सामुहिक, एकत्रित येण्यास, समारंभाला बंदी होती. आता असेच काहीसे लॉकडाऊन जनावरांसाठी करण्यात आला आहे. लम्पी स्किन हा आजार झपाट्याने गाई, म्हशीमध्ये पसरू लागल्याने रायगड जिल्ह्यात पशू बाजार बंद, बैलगाडी शर्यत बंद, पशूंना एकत्रित आणणे आणि तालुक्याच्या सर्व सीमा जनावराच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात अशी लागण झालेले एकही जनावर आढळलेले नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून बेमुदत काळासाठी ही बंदी घालण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित पशू विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात लम्पी स्किन आजार हा गाई, म्हशीमध्ये पसरू लागला आहे. लम्पी स्किन हा संसर्गजन्य आजार असल्याने तो एकाकडून दुसऱ्या जनावरांना होत आहे. त्यामुळे शासनाकडून सर्व पशू विभागाला सतर्क राहून आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हा पशू संवर्धन उप आयुक्त डॉ आर बी काळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पशू संवर्धन अधिकारी डॉ शामराव कदम, प्रभारी सह आयुक्त पशू संवर्धन अधिकारी डॉ राजेश लाळगे उपस्थित होते. याबाबत डॉ. काळे म्हणाले,‘ रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील कोर्लई व बोर्ली गावात पाच संशयस्पद जनावरे आढळली होती. या जनावरांची तपासणी करून त्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र तरीही खबरदारी म्हणून गावातील शेतकऱ्याची बैठक घेऊन गावात फवारणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत आजाराबाबत आवाहन करण्यात आले आहे.
गाई, म्हशी यांना हा आजार जडत आहे. जिल्ह्यात २ लाख ३९ हजार पशुधन आहे. जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण नसले तरी पुणे, पालघर जिल्ह्यात संसर्ग वाढला असल्याने जिल्ह्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आजार होणाऱ्या जनावरांना विलगीकरण करणे, संसर्ग होण्यास नियत्रंण ठेवणे, औषध उपचार करणे, पाच किमी परिसरात रिंग लसीकरण करणे ह्या उपययोजना करण्यात येणार आहेत. नियंत्रण कक्ष तयार केले असून शीघ्र कृती दल निर्माण करण्यात आलेले आहे. आजाराबाबत लक्षणे दिसल्यास १९६२ या हेल्प लाईनवर संपर्क करायचा आहे. जिल्ह्यात १० हजार लसी मात्रा उपलब्ध आहे.
पशू विभागातील सर्वच्या सुट्या रद्द
लम्पी स्किन आजाराच्या अनुषंगाने सर्वच पशू संवर्धन विभाग हा सतर्क झाला आहे. जिल्ह्यात हा आजार वाढू नये यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. आजाराच्या अनुषंगाने कर्मचारी, अधिकारी याच्या सुट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोणीही सुट्टी घेऊ नये , याबाबत हयगय केल्यास कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.