Lockdown News: वेणगावमधील तरुणांच्या पुढाकाराने श्रमदानातून सुटला पाणीप्रश्न; लॉकडाउनमध्ये केलं काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 11:39 PM2020-05-03T23:39:33+5:302020-05-03T23:39:46+5:30
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून काम पूर्ण
संजय गायकवाड
कर्जत : तालुक्यातील वेणगावमधील तरुणांनी लॉकडाउनचा सदुपयोग करून २५ दिवसांच्या कालावधीत श्रमदान करून पाणी वेणगावपर्यंत आणले आहे. आता या गावातील पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे. सर्वच गोष्टीसाठी शासनावर अवलंबून न राहता मनाच्या जिद्दीवर, एकीने आणि सर्वांच्या श्रमदानातून हे शक्य आहे. या कामावरून या तरुणांनी सर्वांना दाखवून दिले आहे. या वेळी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले.
कर्जत तालुक्याला लाभलेले वरदान म्हणून राजनाला कालव्याचे नाव आहे. या कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भातशेती किंवा कडधान्य पिकवली जातात, हे पाणी पूर्वी कर्जत नगरपरिषद क्षेत्राजवळील काही गावापर्यंत येत होते. कालांतराने छोटे कालवे मातीने बंद झाले आणि कालव्याच्या पाण्यावर सिंचन होणारे क्षेत्र कमी कमी होत गेले. याकडे मग शासनाबरोबर नागरिकांचे दुर्लक्ष झाले. वेणगाव हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सुमारे दोन ते अडीच हजार वस्ती असलेले गाव बोरिंग वगळता पाण्यासाठी अन्य कोणताही नैसर्गिक स्रोत नाही. १० -१२ वर्षांपूर्वी टाटा पॉवर हाउसचे पाणी गावातील छोट्याशा बंधाऱ्याला आडवून ते मार्च, एप्रिलपर्यंत पाणी असायचे. राजनाला कालव्याची दुरुस्ती सुरू झाल्यानंतर पाणी येणे बंद झाले. पाणी उपलब्ध नसतानासुद्धा खोल बोरवेल मारून इमारती उभ्या राहिल्या. परिणामी, फेब्रुवारी महिन्यातच बोरवेल कोरड्या पडू लागल्या. अशातच करोनामुळे लॉकडाउन सुरू झाले. गावातील काही तरुणाच्या मनात १० ते १२ वर्षांपूर्वी लुप्त झालेला नाला पुन्हा बंधाºयापर्यंत आणता येईल का? याबाबत विचार सुरू झाला. त्याला ग्रामपंचायत सरपंच अभिषेक गायकर यांचीही साथ मिळाली.
साधन सामग्री फारशी नाही त्यामुळे वर्गणी काढून, कधी रात्रंदिवस स्वत: हातात फावडे, कुदळ घेऊन, कधी अति आवश्यकता असेल तर जेसीबी घेऊन, नाला सफाईला सुरुवात झाली. सरपंच अभिषेक गायकर, शशी गंभीर, उदय आवारी, चेतन शेलार, राजा बोराडे, समीर बोराडे, नरेंद्र पवार, भाऊ म्हसकर, हेमंत बडेकर, संजय पालकर, गणपत बोराडे, संतोष पालकर, चंद्रकांत तिखंडे, स्वप्निल मुंढे, उमेश जोशी, राहुल जोशी, ऋषीकेश दातार, विशाल जोशी, विशाल गोगटे, तुषार जोशी अशा अनेक सहकारी यांनी ही मोहीम यशस्वी केली.
तरुणांचे कौतुक
हाती कमी दिवस होते नंतर नाल्याचे पाणी बंद होणार होते. साथी हात बढाना म्हणत अखेर गंगा अवतरली आणि बंधारा भरला. ३० दिवसांपेक्षा कमी दिवसांत सुमारे २.५ किलोमीटर नाला साफ झाला. लॉकडाउनचा असा सदुपयोग केल्याबद्धल सर्व तरुणाचे
अभिनंदन होत आहे.
कुशीवली ते वेणगाव असा अडीच किलोमीटर हा नाला साफ झाला त्यामुळे पाणी वेणगावपर्यंत आले आहे. वेणगावजवळ धरणवजा बंधाºयात हे पाणी साठले आहे. आता या पाण्याच्या साठ्यामुळे गावातील बोरवेलच्या पाण्याची पातळी वाढेल, तसेच उन्हाळ्याच्या दिवसात प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.