Lockdown News: रायगड जिल्ह्यात दारूच्या दुकानांसमोर रांगा; ग्राहकांच्या हातावर सॅनिटायझरचे स्प्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 02:06 AM2020-05-06T02:06:09+5:302020-05-06T02:06:18+5:30
खरेदीसाठी झुंबड : ; सोशल डिस्टन्सिंग पाळत मद्य विक्री
अलिबाग : मंगळवारी सकाळी दारूची दुकाने उघडी होणार हे नक्की होताच रायगड जिल्ह्यातील तळीराम पहाटेपासूनच बंद असलेल्या दारूच्या दुकानासमोर रांगा लावून उभे होते. दुकान सुरू होताच ती खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. प्रत्येक जण आपला नंबर कधी येणार या प्रतीक्षेत उभा होता. दरम्यान, दुकाने सुरू झाल्यावर ग्राहकांच्या हातावर सॅनिटायझरचा स्प्रे देत सोशल डिस्टन्सिंग पाळत मद्य विक्री केली जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या संचारबंदी व लॉकडाउनला मंगळवारी ४० दिवसांचा कालावधी लोटला आहे. संचारबंदी दरम्यान मद्य विक्री बंद करण्यात आली होती. त्यामुळे मद्यपींना दारूची दुकाने उघडणार कधी, असा प्रश्न होता. लॉकडाउन कालावधीत अनधिकृत मद्य विक्रेत्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे देऊन तळीराम मद्य विकत घेत होते. तर काहींना इच्छा असूनही पैशाच्या अभावी दारू खरेदी करता येत नव्हती. त्यामुळे मद्याची दुकाने कधी सुरू होणार, याकडे तळीरामांचे लक्ष होते. अखेर मंगळवारी रायगड जिल्ह्यातील शासन आणि प्रशासनाने कोरोनाबाधित क्षेत्र वगळून मद्याची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रायगडमध्ये मंगळवार ५ मे रोजी पहाटेपासून दुकानासमोर लांबच-लांब अशा रांगा पाहावयास मिळल्या.
प्रत्येक व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्य विक्री सुरू केली. या वेळी मद्य खरेदी करणाऱ्या व्यक्तीला सॅनिटायझर लावूनच मद्य विक्री के ली जात आहे. त्यामुळे बीयर व वाइन शॉप चालकांनी आपल्या ग्राहकांची योग्य ती काळजी घेतली होती. रेड झोनसह आॅरेंज आणि ग्रीन झोनमधील मद्याची दुकाने सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर तळीरामांच्या आनंदाला पारावर नव्हता. ४ मे रोजी दुकाने उघडणार म्हणून दुकानासमोर रांगा लावून उभे होते. मात्र, दुकाने उघडली नसल्याने हिरमोड झाला होता.
अखेर दीड महिन्यानंतर वाइन शॉप उघडले; कर्जतमध्ये खरेदीसाठी गर्दी
कर्जत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन आहे, त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद आहे, ज्यापासून शासनास कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो असे वाइन शॉप मंगळवार ५ मेपासून सुमारे दीड महिन्याच्या कालावधीनंतर उघडण्यात आले आणि खरेदीसाठी सकाळपासूनच लांबच लांब रांग दिसू लागली. केंद्र सरकारने पुन्हा १७ मेपर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. मात्र या वेळी काही सवलती देण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सवलत म्हणजे देशातील दारूची दुकाने सुरू करण्यासाठी दिलेली परवानगी. त्यामुळे कर्जतमधील तळीरामांनी मंगळवारी वाइन शॉपसमोर रांग लावली होती.
कर्जतमध्ये वाइन शॉप सकाळी १० वाजता उघडले, मात्र पहाटेपासूनच अनेकांनी आपला नंबर लावून ठेवला होता. वाइन शॉपमध्ये
माल देण्यासाठी तीन-चार जण होते. त्यांनी तोंडाला मास्क व हातात ग्लोव्ह्ज घातले होते, बाहेर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी माणसे उभी केली होती. ग्राहक दुकानाच्या काउंटरवर जाण्यापूर्वी त्यांच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत होते. ज्याने मास्क लावले आहे अशांनाच बॉटल विकण्यात येत होती. सकाळपासून लांबच लांब असलेली रांग दुपारी भर उन्हात कमी होईल असे वाटत होते, मात्र कडक ऊन असूनसुद्धा रांग कमी व्हायचे नाव घेत नव्हती.