कर्जत : एमएमआरडीए रिजनमधील नगरपालिका हद्दीत कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन व्यवसायाला मोकळीक देण्यात आली आहे. सरसकट व्यवहार सुरू ठेवणे हे कर्जत शहरात कोरोनाचा फैलाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे कर्जत नगरपरिषदेने पुढाकार घेऊन सर्वांना वेळ ठरवून देण्यात आली असून त्या-त्या दिवशी ती-ती दुकाने उघडली जाणार आहेत. हा निर्णय घेण्याआधी शासकीय अधिकाऱ्यांकडून बाजू समजून घेतली आणि नंतर व्यापारी फेडरेशनच्या बरोबर चर्चा करून मार्ग काढण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिली आहे.
दीड महिन्याचा कालावधी लोटला असून, कोरोनाला दूर ठेवण्यात कर्जत शहराला यश आले आहे. ज्या वेळी कर्जत तालुक्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्या वेळी कर्जत शहराने सलग चार दिवस सर्व व्यवहार बंद ठेवून लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही व्यवहार होत नव्हते आणि त्यामुळे कर्जत शहर अद्याप कोरोनापासून दूर आहे. मात्र, ४ मे रोजी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन अटी आणि शिथिल करण्यात आलेले नियम ही बाब लक्षात घेऊन कर्जत या एमएमआरडीएच्या क्षेत्रातील नगरपालिका हद्दीत कोणत्या बाबींना सूट देण्यात आली आहे. हे जाणून घेण्यासाठी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुढाकार घेतला आणि सर्व प्रमुख अधिकाºयांची मंगळवार ५ मे रोजी भेट घेतली. ४ मेच्या जिल्हाधिकारी निर्णयानंतर अन्य सर्व ठिकाणी व्यवहार सुरळीत झाले; पण कर्जत शहरात मात्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही बाबी यांच्यात सूट दिली नव्हती. कर्जत शहराचे हित लक्षात घेऊन नगराध्यक्ष जोशी यांनी प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि पालिका मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्याबरोबर चर्चा करून शासनाचे नियम आणि अटी समजून घेतल्या. त्यानंतर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह कर्जत व्यापारी फेडरेशन यांच्या पदाधिकारी बरोबर चर्चा केली.कर्जतमधील दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळा : कर्जत व्यापारी फेडरेशनबरोबर चर्चा करून कर्जत शहरात कोणते व्यवहार कोणत्या दिवशी सुरू राहतील याबाबत नियोजन केले. राज्य सरकारचा लॉकडाउन १७ मेपर्यंत असून, त्यानुसार पालिकेने नियोजन केले असून कर्जत नगरपालिका हद्दीमधील सोन्या-चांदीची तसेच हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक आणि मॅकेनिकल वर्क्स यांची दुकाने ६ मे, ११ मे, १२ मे आणि १७ मे या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. कपड्याची आणि चप्पल-बूट यांची दुकाने ७ मे, ९ मे, १३ मे आणि १९ मे या दिवशी उघडी राहणार आहेत. तसेच कटलरी, भांडी, स्टेशनरी, स्वीट आणि खाद्यपदार्थ यांची दुकाने ८ मे, १० मे, १४ मे आणि १६ मे या कालावधीत उघडी राहणार असून, सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सूचना करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया दुकानदारांवर पालिका कारवाई करणार आहे. तर पानटपरी, हॉटेल विक्रीच्या गाड्या यांना सूट देण्यात आली नसून ते व्यवहार बंद राहणार आहेत. भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू आणि दूध यांची दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे नगरपालिके नेजाहीर केले.