Lockdown News: पनवेलहून ओडिशाला जाणारी रेल्वे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 03:59 AM2020-05-08T03:59:07+5:302020-05-08T03:59:18+5:30
रायगड जिल्ह्यातील परप्रांतीयांना घेऊन गुरु वारी रात्री विशेष रेल्वे पनवेलहून सोडण्यात येणार होती
अलिबाग : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याबाबत अडचणी वाढल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेलहून एक हजार २०० मजुरांना ओडिशा राज्यात घेऊन जाणारी विशेष रेल्वे गुरुवारी राज्य सरकारला रद्द करावी लागलीे. ओडिशा उच्च न्यायालयाने परराज्यातून येणाऱ्यांना थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओडिशा सरकारकडून परवानगी न मिळाल्याने आपापल्या गावी निघालेल्या नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल ६० हजाराहून अधिक नागरिकांनी आॅनलाईन अर्ज करुन आपापल्या राज्यात जाण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. आतापर्यंत मध्यप्रदेशसाठी दोन रेल्वे आणि बिहारसाठी एक रेल्वे सोडण्यात आली आहे. त्यामध्ये अनुक्रमे दोन हजार ४०० आणि एक हजार २०० अशा एकूण तीन हजार ६०० नागरिकांचा समावेश आहे.
गुरुवारी रात्री आठ वाजता पनवेल रेल्वे स्टेशनहून ओडिशात रेल्वे सोडण्यात येणार होती. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील ६३०, पेण तालुक्यातील ४१६ आणि अलिबागमधील १५६ नागरिकांना घेऊन रेल्वे पनवेलहून रवाना होणार होती.त्यासाठी अलिबागमधील १५६ नागरिकांना दुपारीच एसटीने पनवेलला नेण्यात आले होते. त्यांना आता परत आणावे लागत असल्याचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी सांगितले. पेण, पनवेल येथील नागरिक रेल्वे स्थानकात पोचले नसल्याने प्रशासनाचा त्रास वाचला आहे. हा निर्णय दुपारी दोन वाजता कळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाने बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यात जाणाºया नागरिकांची सर्व तयारी पूर्ण केली आहे. परंतु बिहार राज्यानेही ११ मे पर्यंत अन्य राज्यातून येणाऱ्यांना मनाई केली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारची अशीच भूमिका असल्याने अडचण वाढली आहे. गुरु वारी तीन रेल्वे पाठवण्याचे नियोजन होते असेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यातील परप्रांतीयांना घेऊन गुरु वारी रात्री विशेष रेल्वे पनवेलहून सोडण्यात येणार होती. मात्र ओडिशा उच्च न्यायालयाने परराज्यातून येणाºयांना थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओडिशाकडे जाणारी रेल्वे सरकारला रद्द करावी लागली आहे. एकट्या महाराष्ट्र राज्यासाठी हा निर्णय नाही, तर सर्व राज्यांसाठी हा नियम लागू होतो. तसेच उत्तर प्रदेश सरकारने तर तपासणी करूनच पाठविण्याबाबत सांगितले आहे. - आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड