रायगड जिल्ह्यात दोन दिवस आधीच उठवला लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 03:21 AM2020-07-26T03:21:34+5:302020-07-26T03:21:46+5:30
रुग्णांत घट नाही । पुनश्च हरिओमचे निर्बंध लागू; पहिल्या दिवशी तुरळक दुकानेच सुरू
आविष्कार देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : लॉकडाऊननंतरही रुग्णसंख्येत घट होत नसल्याने रायगडातील लॉकडाऊन दोन दिवस आधीच उठवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतला आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय अंमलात आला आहे. मात्र, यापुढे पुनश्च हरिओम २ अगेन अंतर्गत लागू असलेल नियम लागू राहणार आहेत, असे चौधरी यांनी आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्यात १५ जुलैपासून लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती. या लॉकाडाऊनला काही नागरिकांनी विरोध केला होता, तसेच लॉकडाऊन उठवण्याबाबत व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदनही दिले होते. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी चौधरी यांनी दोन वेळा थोडी शिथिलता देत लॉकडाऊन सुरू ठेवले होते. मात्र, शेवटी दोन दिवस आधीच त्यांनी लॉकडाऊन उठवला आहे. २४ जुलैच्या रात्रीच असे आदेश काढण्यात आल्याने व्यापारी, व्यावसायिक, तसेच नागरिकांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये व्यवहाराला विशेष गती आल्याचे दिसून आले नाही. अचानक लॉकडाऊन उठवल्याने काही नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली.
लॉकडाऊन केल्यानंतरही जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये घट झालेली नाही. त्यामुळे शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन उठवण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.