Lockdown: म्हसळ्यामध्ये जनता कर्फ्युला प्रतिसाद ; बाजारपेठेत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 03:07 AM2020-07-03T03:07:27+5:302020-07-03T03:07:35+5:30
शंभर टक्के लॉकडाऊन: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चार दिवस बंदचे अवाहन
म्हसळा : शहरामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून रुग्णामध्ये वाढ होऊ नये या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री कापरे यांनी २ ते ५ जुलै जनता कर्फ्यु लावण्याचे आवाहन केले असून शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद दिला असून संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. फक्त मेडिकल दुकाने आणि दूध विक्रेत्यांना यातून वगळण्यात आले आहे. सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत दूध विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, गांभीर्य समजावे आणि संचारबंद ,१४४ कलम लागू असतानाही नागरिकांचे असहकार्य यासाठी म्हसळा नगरपंचायतींने म्हसळेकर आणि व्यापारी संघटनेला २ ते ५ जुलै या चार दिवस अत्यावश्यक सेवा वगळून बंद पाळण्याचे केलेल्या आवाहनाला व्यापारी संघटना आणि नागरिकांनी सहकार्य करून उत्तम प्रतिसाद दिला असल्याचे नगराध्यक्षा जयश्री कापरे यांनी सांगितले. या बंदच्या काळात फक्त औषध दुकाने आणि ठराविक वेळेसाठी दुधाची दुकाने उघडी राहातील आणि किराणा, भाजीपाला तसेच इतर दुकाने चार दिवस बंद रहातील त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही नगराध्यक्षा जयश्री कापरे यांनी केले.